दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
: जालना जिल्ह्यातल्या मच्छिंद्र चिंचोली गावात अंत्यविधीच्या वेळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेत एक पाेलिस कर्मचारी देखील जखमी झाला आहे.
अंत्यविधी करताना जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या मच्छिंद्र चिंचोली गावात घडलीय. गावातील कमलाबाई रामभाऊ आधुडे या महिलेचं काल निधन झालं होतं.
या महिलेच्या अंत्यविधीसाठी बसस्थानकाजवळील पुरातन स्मशानभूमित सरण रचण्यात आले हाेते. ही जागा व्यक्तिगत असल्याची सांगत विष्णू खोसे या व्यक्तीने या ठिकाणी अंत्यविधी करण्यास विरोध दर्शविला.
या जागेचा निकाल कोर्टात माझ्या बाजूने लागला आल्याचं सांगत त्यांनी अंत्यविधी होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. तसेच रचलेले सरण उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. हा विरोध पाहता मयताच्या नातेवाईकानी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान हा वाद विकोपाला गेला. या वादाचे रूपांतर हणामारीत झाल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमाव पांगवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी पाेलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
