
दैनिक चालू वार्ता वाघोली प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
न्हावरे : न्हावरे – तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील धार्मिक कार्यक्रम करून पुन्हा गावी परतणाऱ्या भाविकांची जीप व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाटात तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारी जीप व न्हावऱ्याच्या दिशेकडून येणारा ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात ट्रॅक्टर चालकाने चुकीच्या दिशेने आपले वाहन आणल्याने हा अपघात झाला. या अपघातात पिकअप गाडी पलटी झाली असून ट्रॅक्टरची पाठीमागची चाके तुटून बाजूला पडली आहेत. ट्रॅक्टरच्या इतर भागाचे ही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
सदर रस्त्याचे काम चांगले झाले आहे परंतु सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने कुठलीही ठोस पावले उचललेली नाही, कुठेही दिशादर्शक फलक, बाजूने कठडे अशा उपाय योजना केलेल्या नाहीत. त्या मुळे या ठिकाणी वारंवार अपघाताचे प्रमाण वाढले आहे. म्हणून प्रशाlसनाने या गंभीर दखल घेऊन ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी मागणी सोसायटीचे चेअरमन भानुदास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कोकडे, अमृत भगत, बाळासाहेब कोकाटे यांनी केली आहे.