
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलुर प्रतिनिधी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार ‘प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच मिळाले पाहिजे’ या मागणीचे निवेदन येथील प.पू.गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षक,मुख्याद्यापक यांच्या वतीने नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे द्वारा महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री मा. शिक्षण मंत्री, राज्याचे मा.प्रधान सचिव, मा.शिक्षण संचालक तसेच मा.शिक्षण उपसंचालक, मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनाही निवेदन देण्यात आले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई या संस्थेने पूर्वीपासूनच किमान प्राथमिक शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा मराठीच असले पाहिजे असा आग्रह धरलेला आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये उल्लेखित केल्यानुसार इ.५वी पर्यंत किमान शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा मराठी व राजभाषा हिंदी असावे यासाठीचे प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी व मुख्याद्यापक दमन देगांवकर यांच्या स्वाक्षरीचे निवेदन दि.8/03/23 जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले.
लहान मुले महत्त्वाच्या संकल्पना आपल्या मातृभाषेतच अधिक प्रभावीपणे शिकत असतात व त्या संकल्पना त्यांना मातृभाषेतूनच अधिक समजतातही. मातृभाषा मराठी किंवा राजभाषा हिंदी माध्यमातून प्राथमिकचे शिक्षण मिळाले तर मुलांच्या मनावरचा ताणही कमी होऊन शिक्षण प्रक्रिया आनंददायी बनेल. या हेतूने मातृभाषेच्या माध्यमाचा आग्रह संस्थेने धरला आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सारांशातील बिंदू क्र. ४.१७ मध्ये उल्लेखिल्यानुसार ज्ञानाचे भांडार व संस्काराची भाषा म्हणून संस्कृत भाषा शिकण्याची व्यवस्था पायाभूत शिक्षणापासूनच निर्माण करावी. वैदिक गणिताचा अंतर्भाव इयत्ता पहिली पासून गणित या विषयात करावा. अशा मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र शासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे हे निवेदन प्राथमिक विद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे देण्यात आले.