
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-निसर्ग इतका विक्षिप्त आणि विचित्र वागेल असं शेतकऱ्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.शेतकरी हा मातीला,निसर्ग माय बाप मानतो.हेच आपल्यावर कोपले की काय अशी परिस्थिती महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांमध्ये बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं बघायला मिळत आहे.
हा अवकाळी पाऊस तर येतोच आहे पण सोबतीला गारपीटही घेऊन येतोय. त्यामुळे शेतातल्या गहू, हरभरा, मका, कांदा, आंबा, ज्वारी,द्रांक्षासह डाळींबाच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या आहेत. हा पाऊस येतोय आणि शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेतोय. सोशल मीडियावर एक भयानक अवकाळी पाऊस आणि गारपिटाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पण राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ आणि हवालदिल झालाय.
जुने पेन्शन लागू करा या मागणीसाठी राज्यातील १८ लाखाच्या वर शासकीय व निमशासकीय कर्मचारी देखील संपावर गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामा कोण करणार? त्यांचं दु:ख कोण समजून घेणार? त्यांच्या मदतीचं काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा होत नाही तोपर्यंत त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळणं शक्य नाही. त्यामुळे मायबाप सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष देणे आता अत्यंत गरजेचे आहे. अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.