दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यात शुक्रवार व शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला. या गारपिटीने तालुक्यातील गहु, हरभरा, ज्वारी, कांदा टरबूज इत्यादी पिकासह मोठे नुकसान झाल्याने घट होण्याची शक्यता आहे. सायंकाळी अचानक वातावरण बदलले. तालुक्यातील विविध भागात अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अवकाळीमुळे पावसामुळे मंडप व्यावसायिक वीटभट्टी मालक संकटात सापडले असून मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वांत जास्त शेतीमालाला याचा फटका बसला असून आता तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्याला शासनाच्या मदतीची तत्काळ गरज आहे. उन्हाळा तोंडावर
असतांना काढणीला आलेल्या रब्बी पिकाची काढणी चालु असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा संकटात सापडल्याचे पहावयास मिळते. अशातच आता पुढचे 3 दिवस राज्यात पाऊस होण्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आल्याने हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेणार की काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
अवकाळी पावसाने धडक दिल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत.18मार्च ला सायंकाळी 7:30 वाजता पावसाने दमदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले हरभरा, गहु, ज्वारी पिक जमीनउध्वस्त झाल्याने मोठा फटका बसला आहे.
त्यामुळे शेतकरी पुन्हा अस्मानी
संकटात सापडला असल्याने
परिसरातील शेतकरी हवालदिल
झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या
चिंतेत वाढ झाली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची उडाली तारांबळ
अचानक पाऊस कोसळल्यामुळे काही शेतकऱ्यांनी गहू, हरभऱ्याच्या पिकाची कापणी करुन ठेवली. अचानक आलेल्या पावसामुळे पिकाच्या रचलेल्या गंजीत पाणी शिरल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले. तर पाऊस येईल या भीतीने रात्रीच्या सुमारास काही शेतकऱ्यांनी ताडपत्रीचे आच्छादन गव्हाच्या गंजीवर झाकण्यासाठी नेले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली तर काही शेतकऱ्यांची कापणी केलेली रब्बी पिके ओलीचिंब झाली. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी असे केहाळ वडगाव येथील शेतकरी बद्रीनाथ दवणे यांनी सांगितले.
