
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी (श)(वर्धा): येथील डॉ. प्रल्हादराव उमरकर यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी अवयव दान प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता. यात उपस्थित एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १५ जनांनी हा फॉर्म भरून मृत्यू नंतरही कोणाचे तरी जीवन फुलविण्यास आम्हीही सहभागी झालो या उत्साहात वाढदिवस साजरा केला. अवयव दानाबद्दल लोकांमध्ये बरीच भीती आणि गैरसमज आहेत हे दूर होणे गरजेचे आहे. तसेच विविध विचाराची प्रबोधनात्मक मांडणी करतांना ते विचार आधी स्वतः कृतीत उतरविणे गरजेचे ठरते त्यासाठी घरातूनच हा जनजागृती उपक्रम राबविल्याचे प्रतिक्षा उमरकर (दापूरकर) सांगतात. त्या तारुण्यवेध संघटिका तसेच महा. अंनिसच्या कार्यकर्ता आहे.
अवयव दानाबद्दलची भीती आणि समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी असे कार्यक्रम करणे स्त्युत्यच म्हणावे लागेल अशा शब्दात मा. सुनील साबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
डॉ. उमरकर यांच्या ९१ वर्षीय मातोश्री शांताबाई यांनी देखील स्वेच्छेने हा फॉर्म भरून पुरोगामी सामाजिक विचाराचा पायंडा दिला.
भारत केंद्र सरकारने ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-१९९४’ ला लागू केला. मृत्यूनंतर एक देह सात जणांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. माणसे मरतात तेव्हा आपण एकतर त्यांना जमिनीत पुरतो नाहीतर जाळतो. तेव्हा शरिरातील चांगले अवयव नष्ट होतात. त्यापेक्षा त्यांच्या अवयव दानामुळे गरजू रुग्ण जर मरणाच्या दारातून परत येणार असेल व तो पुढे चांगले आयुष्य जगणार असेल तर अवयवदानासारखे महान काम नाही.
दरम्यान, डॉ. उमरकर यांचे औक्षण झाल्यानंतर गुरुदेव उपासक प्रमोद बुरंगे, लहान आर्वी माजी सरपंच सुनील साबळे, प्रतिभा दापूरकर, विनया साबळे, बी. टी. उरकुडे यांनी जनजागरणपर आपली मांडणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच आभार प्रतिक्षा दापूरकर यांनी केले.
यावेळी शांताबाई उमरकर, डॉ. प्रल्हादराव उमरकर, मनिष उमरकर, प्रतिक्षा दापूरकर, पद्माकरराव दापूरकर, रेखा दापूरकर, प्रतिक दापूरकर, प्रेरणा दापूरकर, प्रतिभा दापूरकर, ऋतुजा जाणे, लक्ष्मी जाणे, विनया साबळे, सुनील साबळे, किशन गजबे, प्रा. बाबाराव उरकुडे, कांता बोहरपी, प्रमोद बुरंगे यांनी फॉर्म भरून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
सगळी कडे त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.