
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी -विजयकुमार चिंतावार :- आपल्या देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व आजच्या तरुण पिढीला जर कळाले नाही तर ते मिळवलेले स्वातंत्र्य टिकवणे खूप कठीण आहे असे विचार ह.भ.प. भागवताचार्य विश्वनाथ महाराज काकांडीकर यांनी दि.२६ मार्च रोजी तालुक्यातील मौजे कामनगाव येथे हनुमान मंदिराच्या कलशारोहण समारंभा निमित्त आयोजित हरिनाम सप्ताहातील कीर्तन सोहळ्यातून बोलताना व्यक्त केले.त्यांनी पुढे बोलताना सांगितले की आपण मिळवलेल्या स्वातंत्र्याला या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या धामधूमीने साजरा करीत आहोत.परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीतरी लोकांनी आपले प्राण नौछावर केले,कित्येकांच्या संसाराची राख रांगोळी झाली, कित्येक लोकांना मृत्यूपेक्षाही भयान यातना कारागृहात सोसाव्या लागल्या याची जाणीव आजच्या तरुण पिढीला असणे अत्यंत अगत्याचे आहे. तरच आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने टिकून राहील अन्यथा मिळालेले स्वातंत्र्य पुन्हा जाण्याची भीती त्यांनी बोलताना व्यक्त केली.
आजही आपल्या देशात असे काही महाभाग आहेत की जर १५ ऑगस्ट हा दिवस रविवारी आला तर एक दिवसाची सुट्टी बुडाली म्हणून ते दुःखी होतात. याच्या एवढे मोठे दुर्दैव आपल्या देशाचे कोणते आहे ? आणि असा चैतन्यहिन समाज जर निर्माण झाला तर मिळालेले स्वातंत्र्य टिकणे खूप अवघड काम आहे. म्हणून साधुसंतांनी,महंत महानुभावानी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान व त्याग केलेल्या सर्व राष्ट्रपुरुषांचा तेजस्वी इतिहास सदैव जनतेसमोर जीवंत ठेवला पाहिजे असे सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की ज्याला मृत्यूचे विस्मरण झाले तो जीवनात गाफील आहे व ज्याला मृत्यूचे भान आहे तो खऱ्या अर्थाने जीवनात जागा आहे असा उपदेश भगवान गौतम बुद्धांनी केलेला आहे. म्हणून अंतकाळी आपली बुद्धी स्थिर राहावी यासाठी साधुसंतांनी आपणास भगवंताचे नामस्मरण हा सोपा मार्ग सांगितला आहे. त्याचे विस्मरण होऊ नये म्हणूनच आपण अखंड हरिनाम सप्ताह साजरे करतो असे सांगितले. यावेळी भोकर,हाळदा, मोघाळी,कामनगाव,हाडोळी, लामकाणी,चिंचाळा,पांगरी आदी सह अनेक गावची भजन करी मंडळी उपस्थित होती तर पंचक्रोशीतील शेकडो माता भगिनी व भाविक भक्तांची मांदियाळी त्यांचे कीर्तन श्रवण करण्यासाठी आवर्जून उपस्थित होती.