दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ १ मे २०२३ रोजी सकाळी ८ वाजता जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे होणार आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी प्रभावी नियोजन करावे,असे निर्देश उपायुक्त संजय पवार यांनी आज येथे दिले.विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित महाराष्ट्र दिन सोहळ्याच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.विवेक घोडके,महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त देविदास पवार,पोलीस उपायुक्त प्रशांत राजे,उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले,तहसिलदार वैशाली पाथर,संतोष काकडे,निता लबडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले की,महाराष्ट्र दिनी सर्व शाळांनी सकाळी साडेसहा वाजता प्रभातफेऱ्या काढून मुख्य समारंभासाठी वेळेपूर्वी पोहोचावे.अधिकाधिक लोकांना या समारंभास उपस्थित राहता यावे,यासाठी यादिवशी इतर शासकीय कार्यालय, संस्थांनी ध्वजारोहण सकाळी ७.१५ च्या पूर्वी किंवा सकाळी ९ नंतर आयोजित करावेत.कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत बॅन्ड पथकाद्वारे सादर करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले की,कार्यक्रमासाठी स्वागत व समन्वय समिती,ध्वजवंदन संचालन व मैदानावरील कार्यक्रम समिती,सांस्कृतिक कार्यक्रम समिती आदी समित्या गठित करण्यात आल्या आहेत.ध्वजवंदन संचलन,सामूहिक कवायत,मैदानावरील कार्यक्रम,चित्ररथ,आवश्यक सराव यादृष्टीने नियोजनपूर्वक कार्यवाही करावी.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फर्निचर,स्वागतद्वार उभारणी,सजावटीच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी.अतिथी व उपस्थितांची बैठक व्यवस्था,आवश्यक स्वयंसेवक,ध्वनीयंत्रणा आदी व्यवस्था काटेकोर असावी.महापालिकेकडून स्वच्छता,पेयजल सुविधा,मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांना खाऊवाटप आदी व्यवस्था पुरविण्यात यावी. दि.२५ एप्रिल ते १ मे दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.त्या दृष्टीने मंडप,बैठक व्यवस्था व मान्यवरांसाठी उभे राहण्याची सोय आदींचे सुरळीत नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
१ मे,महाराष्ट्र दिनाची रंगीत तालीम दि.२९ व ३० एप्रिलला सकाळी ८ वाजता जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.त्यादृष्टीने सर्व कार्यान्वयन विभागांनी प्रभावी नियोजन व व्यवस्थेच्या तयारीला सुरुवात करावी,असेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम
महाराष्ट्र दिनी सायंकाळी ७ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.त्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असून,शिक्षण उपसंचालक हे आमंत्रक असतील.माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कार्यक्रम यथोचितरीत्या साजरा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.
