
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : जालन्यातील मंठा बाजार समितीच्या आवारात ४० वर्षाच्या प्रदीप कायंदे या तरुणाचा ८ एप्रिलला मृतदेह आढळून आला होता. एका एजन्सीमार्फत बँक वसुली अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कायंदे यांचा खून झाला असल्याचे वैद्यकीय अहवालावरून निष्पन्न झाले होते. या खुनाच्या तपासामध्ये अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली असून ‘बोल्ड गे’ अँपवरून जुळलेल्या समलिंगी संबंधांतून हा खून झाला असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी होमगार्डसह मुख्य आरोपीला अटक केली असून पोलीस आणखी ईतर आरोपींच्या शोधात आहेत
समलिंगी संबंध प्रस्थापित करण्यासाठी फेमस असलेल्या ‘बोल्ड गे’ ॲपच्या माध्यमातून मंठा येथील एका ग्रुपच्या प्रदीप कायंदे हा दोन वर्षापासून संपर्कात आला होता. प्रदीप हा नोकरीनिमित्त उंबरखेड येथून जालना येथे मोटार सायकलवरून अपडाऊन करत होता. मात्र, अनेकदा घरी पत्नी व मुलं असताना देखील समलैगिक संबंधाची चटक लागलेला प्रदीप हा गावी न जाता थेट मंठा येथे त्याच्या समलिंगी मित्राकडे जात होता.
त्या मित्राच्या पत्नीशीही ठेवले संबंध
दरम्यान ७ एप्रिलला ड्युटी आटोपून प्रदीप हा रात्री जालना येथून थेट मंठा येथे त्याचा मित्र सोपान बोराडे याच्या शांतीनगर येथे घरी मुक्कामी गेला होता. त्याने ठरल्याप्रमाणे आधी समलिंगी मित्रासोबत लैंगिक संबंध ठेवले. नंतर त्याच्या पत्नीसोबतही संबंध ठेवले. तो रात्री सोपान बोराडे याच्या घरी थांबलेला असतांना त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सोपान बोराडे याने त्याच्या काही मित्रांना बोलावून प्रदीपला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यावर घाव घातले. या मारहाणीत प्रदीपचा मृत्यू झाला.
मोटार सायकलवरून जात मृतदेह फेकला
प्रदीपचे प्रेत मोटार सायकलवरून सोपान बोराडे याने त्याचा होमगार्ड भाऊ प्रकाश बोराडे याच्या मदतीने बाजार समितीच्या आवारात असलेल्या जगदंबा जिनिंगमध्ये नेऊन टाकला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. मयत हा दोन वर्षांपासून आरोपीसोबत समलैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर आरोपीच्या पत्नीसोबतही अनैतिक संबंध ठेवत असल्याची धक्कादायक बाबही तपासात पुढे आली आहे.
दोन्ही भाऊ ताब्यात
सदर प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती काही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आणि मोबाईल संभाषणही हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार सोपान बोराडे त्याचा भाऊ प्रकाश बोराडे यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या खुनाच्या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची पोलिसांना शंका असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.