
दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम-वसंत खडसे
वाशिम : नागपूर-मुंबई महामार्गावर सोमवार, ८ मे रोजी रात्री ९ वाजता बस आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली. सदर अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की बसची डावी बाजू पुर्णतः क्षतिग्रस्त झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी रात्री ९ वाजता हा अपघात झाला. लक्झरी बस क्रमांक पी.वाय. 0५ इ.१९५८ पुण्याच्या दिशेने जात होती. मालेगाव नजीकच्या वडप गावाजवळ महामार्गावर ट्रक क्रमांक एम.एच.३४ बी.जी. ७४५८ नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता. सदर उभ्या असलेल्या ट्रकवर डाव्या बाजूने लक्झरी बस आदळली. या अपघातात बसच्या डाव्या बाजूचा चुराडा झाला आहे.
अपघातानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावले, उपस्थित असलेल्या काही लोकांनी पोलीस ठाणे आणि १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मालेगावचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप लांडगे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल उद्धव थोंबाळ, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, जितू पाटील, गणेश मेटांगले, नायब पोलीस कॉन्स्टेबल माणिक खडसे, चालक नायब पोलीस कॉन्स्टेबल किशोर नवलकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच १०८ रुग्णवाहिकेचे चालक राहुल सांगळे व डॉ. हेमंत जोरेवार घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बचाव कार्य करणाऱ्या लोकांच्या मदतीने जखमींना मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.
भीषण अपघातानंतर लक्झरी बसचा चालक फरार झाला आहे. दीपक सुरेश शेवाळे, वय २९, रा. गणेशपूर तालुका रिसोड, जिल्हा वाशिम, अक्षय प्रभू चव्हाण, वय २३, रा. साखरा तालुका डिग्रस, जिल्हा यवतमाळ, मंगेश शेषराव तिखे, रा.वाघजाळी तालुका व जिल्हा वाशिम, अजय भारत शेलकर वय ४०, रा. कडसा तालुका डिग्रस, जिल्हा यवतमाळ या चौघांचा जागीच मृत्यू झाला.
रात्री त्याची ओळख पटू शकली नाही. सर्व मृतदेह वाशिमच्या शवागारात पाठवण्यात आले होते.
अपघातात गंभीर जखमींमध्ये सुशीला राठोड वय २५, रवी राठोड वय ३२, संदेश चव्हाण वय २० व स्वाती राठोड वय ७, सर्व रा. वडगाव जि. यवतमाळ, देविदास आडे वय ४० रा. पन्हाळा जि. यवतमाळ, रायचरण राऊत वय ६४ रा. महागाव जि. यवतमाळ अमोल मनोहर वय २९, संजय राठोड वय ४० व विठ्ठल राठोड वय ४५ तिघेही रा. यवतमाळ, रवींद्र गुंजकर वय ३९ विठ्ठल केनवडकर वय ३६ व भीमराव वाकुडे वय ६५ तिघेही रा. केनवड तालुका रिसोड जिल्हा वाशीम यांचा समावेश आहे.
या प्रकरणी बसमध्ये प्रवास करणारे संजय नारायण राठोड वय 35, रा.ब्रम्हनाथ, तालुका दारव्हा जि. यवतमाळ यांनी ९ मे रोजी सकाळी ६.४१ वाजता दिलेल्या फिर्यादीवरून मालेगाव पोलीस ठाण्यात फरार लक्झरी बस चालकाविरुद्ध गुन्हा क्रमांक १९५ / २०२३ नोंदवून भादंवि च्या कलम २७९, ३३७, ३०४ अ नुसार प्रकरण दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताचा तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन चौधरी करीत आहेत.