
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- हल्ली आधुनिक शेती हे शब्द कानी पडताच डोळ्यासमोर अनेक चित्र तरळतात.अनेकांनी आधुनिक शेती संकल्पना स्वीकारली आणि यशाला मूर्त स्वरूपही दिले परंतु याला बाधक ठरतात ते अस्मानी आणि सुलतानी संकटे.ज्यामुळे शेतकऱ्यांनी योजिलेल्या सर्व स्वप्नांचा चुराडा होतो आणि हाती काहीच शिल्लक राहत नाही तेव्हा तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागेवर नाईलाजाने कुऱ्हाड चालवावी लागली असे मन सुन्न करणारे चित्र उस्माननगर येथील शिवारात पाहायला मिळाले.
कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील शेतकरी मारोती बालाजी घोरबांड यांनी त्यांच्या स्वमालकीच्या शेती सर्व्हे क्र. ५६७ मध्ये एक एकर क्षेत्रावर २०२० मध्ये लिंबोनी पिकाची लागवड केली होती. जगण्यातल्या संघर्षाला बळ मिळेल अशी मारोती यांची धारणा होती.पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी वेगळा प्रयोग करावा ज्यातून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा होती.त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सिडलेस लिंबोनी फळपिकाची लागवड त्यांनी केली.नाशिक येथून या लिंबोणीची रोपे आणली होती.लागवड खर्च पन्नास हजार रुपये करत एक एकर क्षेत्रावर आठ बाय आठ अंतर ठेवून लिंबोणीची लागवड करण्यात आली होती.एकूण सहा सदस्य असलेल्या मारोती यांच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह शेतीवर असल्याने मोठ्या कष्टाने लिंबोणीची बाग फुलवली होती.उन्हाळ्यात पाण्याअभावी लिंबोणीची झाडे सुकत असताना डोक्यावर पाणी वाहून फळबागेची काळजी घेतली होती.अंगमेहनत वगळता साधारणतः तीस हजार रुपयांचा इतर खर्च करण्यात आला होता.बहरलेली बाग चांगले उत्पन्न देईल व वर्षाकाठी साधारणपणे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असतानाच मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका लिंबोणीला बसला लिंबाला योग्य तो भावही मिळाला नाही.दहा ते वीस रुपये किलो दराने लिंबू विकावे लागल्याचे मारोती यांनी सांगितले.मेहनत मातीमोल झाली त्यामुळे न परवडणाऱ्या लिंबोणीच्या शेतीवर नाईलाजाने मारोती घोरबांड या शेतकऱ्याने लिंबोनिच्या झाडावर कुऱ्हाड फिरवली.