
दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम – वसंत खडसे
वाशिम : जिल्हयातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या केनवड येथील शेतकरी भानुदास सदुजी गोळे यांच्या शेतात बसवण्यात आलेल्या सोलर पॅनलचे नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
केनवड येथील ” दावजीबुवा ” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेत शिवारातील गट नंबर २३७ मधे शेतकरी भानुदास सदूजी गोळे यांची जमीन असून, ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. कमी खर्चात आणि पारंपरिक विजेची बचत व्हावी या उद्देशाने त्यांनी आपल्या शेतात सिंचन सुविधेसाठी सोलर पॅनल बसवले आहे. परंतु नुकत्याच आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने त्यांची सोलर सिस्टीम संपूर्णतः क्षतिग्रस्त झाली आहे. परिणामी सोलर पॅनलचे अतोनात नुकसान झाले असून, सदर नुकसानीची पाहणी केनवड येथील सरपंचांनी करून त्यांच्या समक्ष पंचनामा केला आहे. सोलर पॅनलच्या नुकसानीमुळे पुढील सिंचन सुविधेसाठी शेतकरी भानुदास गोळे चिंताग्रस्त झाले आहेत. शासनाकडून नुकसान भरपाईची मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.