
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी
माणिक सुर्यवंशी…..
नांदेड:मौजे आदमपूर,(ता.बिलोली) येथे जेष्ठ साहित्यिक प्रा.डाॅ.रवींद्र शोभणे यांची आगामी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल आदमपूर परिसरातील शब्द सारस्वतांनी स्वागत आणि अभिनंदन केले आहे.
जळगांव मधील अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजित आहे. नागपूर येथील कथाकार, कादंबरीकार, समीक्षक डाॅ.रवींद्र शोभणे यांची एकमताने साहित्य महामंडळाने निवड केली. याआधी १९५२ साली कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन अमळनेर येथे संपन्न झाले होते. २०२४ साली हे दुसरे संमेलन नियोजित आहे. पूज्य साने गुरूजींच्या पावन कर्मभूमीत हे संमेलन होणार आहे. याचाही अगाध आनंद आहे! कथा कादंबरी अनुषंगाने वास्तव समाजभान, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, वैदर्भीय वर्हाडी बोलीभाषेचा लहेजा, लयपूर्ण संवादशैली,वाचनावरील पकड,
अशा वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी शोभणे यांचे लेखन व्यापलेले आहे.एक सकस आणि सुजाण साहित्यिक संमेलनाध्यक्ष पदी निवडले गेल्याचा आनंद आहे!
सदरील छोटेखानी स्वागत व अभिनंदन समारंभात जेष्ठ बालसाहित्यिक शं.ल.नाईक, प्रा.संदीप भुरे,ह.भ.प.मारोती महाराज खतगांवकर, जाफर आदमपूरकर, दर्शन भंडारे,
मारोती वाघमारे,बालाजी पेटेकर,
अनिल वाघमारे,अ.बा.शेख हिप्परगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.