
वाशिम जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या बळीराजा चिंताग्रस्त.
सोयाबीन उत्पन्नात घट होण्याची शक्यता.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर.
वसंत खडसे
उपसंपादक वाशिम
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड मालेगाव सह इतर तालुक्यात सुद्धा जून महिना संपला असून अद्याप पर्यंत दमदार पाऊस न पडल्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. उशिरा झालेल्या पेरणीत उत्पन्नात हमखास घट होते हा आजवरचा अनुभव असल्याने, जिल्ह्यातील हक्काचे पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, आणखी काही दिवस दमदार पावसाचे आगमन न झाल्यास जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर वर येणार आहे. एरवी पेरणी झाल्यानंतर दडी धरून बसलेल्या पावसाला विनवणी करणाऱ्या बळीराजावर यावर्षी प्रथमच पेरणी अगोदर आभाळाकडे डोळे करून, धोंड्या.. धोंड्या.. पाणी दे..! गाई वासराला चारा दे..!! अशी म्हणण्याची केविलवाणी वेळ आज शेतकऱ्यांवर आली आहे.
चांगल्या पावसाच्या आशेवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहेत. मात्र आता जून महिना संपला असून जुलै सुरू होत आहे, तरी अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. पेरणीसाठी महागडे बी बियाणे रासायनिक खते खरेदी करून सज्ज झालेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खरिपाची पेरणी करण्याचा कल असतो. वेळेवर पाऊस झाल्यास सात जूनच्या आसपास मूग, उडीद, तूर, सोयाबीन आदी पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्यास शेतमालाचा उतारा चांगला येतो. असा अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र यावर्षी जूनच्या पेरणीचा मुहूर्त हुकल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज सकाळी सोसाट्याचा गार वारा दुपारी कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण आणि परत सायंकाळी पावसाचे दाटून आलेले ढग व रात्री टिपूर चांदणे पडत आहे. गेल्या पाच सहा दिवसापासून सुरू असलेल्या ऊन सावलीच्या खेळाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले होते. परतीच्या पावसाने झोडपल्यानंतर मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांची दाणादाण उडवून दिली. अशा एकापाठोपाठ नैसर्गिक संकटांचा सामना करत शेतकरी कसेबसे नव्या हंगामासाठी मोठ्या जोमाने कामाला लागले. मात्र संपूर्ण जून महिना संपला तरी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास जनावरांच्या वैरणीचा प्रश्न शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच वाढ करणार असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे…