जालना प्रतिनिधी आकाश माने
पुण्यातून नियमित प्रकाशित होणाऱ्या न्याय,निर्भीड व परखड लिखाण करणाऱ्या निःपक्षपाती दैनिक ‘चालू वार्ता’ ला पाहता पाहता आज तब्बल 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. दैनिक चालू वार्ता आता 3 व्या वर्षात पदार्पण करीत असून आज दैनिक चालू वार्ता चा 2 वा वर्धापनदिन आहे.कोणत्याही वृत्तपत्राचा वर्धापन दिन हा त्या वृत्तपत्र परिवार, वाचक, हितचिंतकांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असते.सोशल मिडियाच्या जगात प्रिंट माध्यमाला थोडी उतरती कळा लागलेली असली तरी आपल्या न्याय,निर्भीड, परखड भूमिकेवर ठाम राहून वाटचाल करणारी अनेक वृत्तपत्र आजही समाजात आपली वेगळी ‘ओळख’ व ‘खप’ टिकवून आहेत. ”दैनिक चालू वार्ता” हे ही त्यापैकीच एक असून सध्या वृत्तपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असली तरी सर्वच वृत्तपत्र आपल्या ठरलेल्या भूमिकेतून वाटचाल करत नाहीत.अनेकांचे ‘खोके’ पाहून ‘डोके’ चालते म्हणजे ध्येय,घोरण,तत्वांना तिलांजली देत बातम्या प्रकाशित केल्या जातात. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत किळसवाणी झाली असून सत्तेच्या सिंहासनासाठी अनेक राजकीय पक्ष, नेते आपल्या मूळ विचारांना,तत्वांना मूठमाती देवून आपली भूमिका एका रात्रीतूनच बदलवित आहे. ‘ दैनिक चालू वार्ता’ मात्र आपल्या न्याय,निर्भीड, निःपक्षपाती भूमिकेवर गेल्या 2 वर्षांपासून ठाम असून ‘खोके’ पाहून कधीच ‘डोके’ चालविले नाही तर सर्वसामान्य जनता,शेतकऱ्यांसह समाजासमोर असलेले ‘धोके’ पाहून ते मार्गी लावण्यासाठी ‘दैनिक चालू वार्ता” ने परखड लिखाण केले,करत आहे तसेच यापुढेही करतच राहणार. बदलत्या राजकारणात लोकप्रतिनिधींचे लक्ष
हे सर्वसामान्य जनता,कष्टकरी, शेतकरी, महिला,तरुण,विद्यार्थी यांच्या प्रश्नांकडे आवश्यक त्या प्रमाणात राहिले नसून ते सत्तेच्या प्रसादाकडेच लागलेले असते. जिल्ह्यात शेतकऱ्यांसमोर वाईट परिस्थिती असून गेल्या 10 वर्षात तब्बल 793 शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे त्यातही सरकारी कागदावर न आलेले वेगळेच.सर्वत्र अवैध धंदे बोकाळलेत,चोऱ्या वाढल्यात,कायदा व सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडालाय.मुली,महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. विजेची जोडणी,डीपी घेण्यासाठी तसेच अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘पान फुल’ वाहावे लागते.अशा सर्व गंभीर परिस्थितीत संबंधित यंत्रणेला वेसण टोचण्याचे काम ‘दैनिक चालू वार्ता’ इमाने इतबारे करत आहे.एका सक्रिय विरोधी पक्षाप्रमाणे जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडून त्याची सोडवणूक करण्याचे काम दैनिक चालू वार्ता ने केले व करत आहे.त्यामुळेच ‘दैनिक चालू वार्ता’ हा केवळ वाचकांच्याच नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे.
बहुतांशी वृत्तपत्रे आपण उघडून पहिली तर ती कोणत्या तरी राजकीय पक्षास, विचारास, पंथास, धर्मास किंवा संस्थेस वाहिलेली असल्याचे आढळून येते. मात्र ‘दैनिक चालू वार्ता”ने आजपर्यंत स्वतःवर कोणत्याही पक्षाचा ‘शिक्का’ लावून न घेता निःपक्षपाती बातम्या प्रसिद्ध करून जनतेच्या मनावर स्वतःचा ‘ठसा’ उमटविलेला आहे.’दैनिक चालू वार्ता’ च्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि जनतेच्या समस्यांवर आवाज उठविण्याच्या,न्याय मिळवून देण्याच्या आमच्या आक्रमक भूमिकेत गेल्या 2 वर्षात तसूभरही फरक पडलेला नाही आणि भविष्यातही पडणार नाही.भ्रष्ट व्यक्ती असो की भ्रष्ट कारभार त्याविरुद्ध ‘दैनिक चालू वार्ता” आसूडाचे फटके मारतच राहणार..