
दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- आज संपूर्ण देशात घटनाक्रमाने घडत असलेल्या घटना म्हणजे वाढती भांडवलशाही, त्या खाली दबलेला बेरोजगार तरुण, परमोच्च जातीय द्वेष, राज्याची सामाजिक व राजकीय अस्थिरता, राष्ट्र स्तरावर सनातन धर्मातील ‘पापयोनी’ म्हणवलेल्या ‘स्त्री’ जातीचा येथेच्य विटंबणा. या सर्व घटनांना आपल्या आयुष्यात पाहिलेल्या,भोगलेल्या, या व्यथांना आपल्या शब्दातून पाझर फोडणाऱ्या,लढा देणाऱ्या शब्दसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची आज प्रकर्षाने आठवण होत आहे.
अण्णाभाऊ यांचे लिखाण त्यांना मिळत गेलेल्या जाणिवा व नेनीवांमुळे काळानुरूप नेहमी बदलत गेले. मग वाचकांनी त्यांना त्यांच्या सोयीस्करपणे कम्युनिस्ट,मार्क्सवादी तर कोणी आंबेडकरवादी म्हणून घोषित केले. वरील वादापेक्षा त्यांनी महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या जगाच्या तुलनेत बदलत गेलेली परिस्थिती जाणून वास्तवता आपल्या शब्दात मांडली आहे. रशियात घडलेल्या कामगार चळवळीच्या क्रांतीमुळे पायउतार केलेला भांडवलदार त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला वाचला आणि त्या क्रांतीचे प्रणेते असणारे कार्ल मार्क्स, स्टॅलिन,लेनिन, गार्की यांचे ते चाहते झाले. ती क्रांती भारतात होण्याची स्वप्ने त्यांना पडत व त्या अनुषंगाने लिखाणाच्या माध्यमातून येथील कामगार, नोकरदार,श्रमिक,शेतकरी या *निखार्यावरील राख झटकण्याचा प्रयत्न ते करत* त्यांना वाटे ही राख एकदा उडाली की हे निखारे पेटून उठतील आणि क्रांतीची मशाल पेटवून कायम तेवती ठेवतील व त्या प्रकाशात ते कामगार नोकरदार यांना उजाडून येईल पण ते दिवस त्यांच्या उत्तरकाळातही आले नाहीत. आज राजकीय नेते देशाला विश्वगुरू बनवण्याच्या वल्गना करतांनाच एखादा दारुडा स्वतःच्या व्यसनापाई घरातील भांडी व वस्त्रे विकून स्वतःची तल्लब भागवतो तद्वतचं देशाची परिस्थिती आज देशाच्या नेत्याने करून ठेवली आहे. यामुळे नऊ-दहा संस्थानिकाच्या हातात देशाचे अर्धे अधिक भांडवल जमा झाले असून त्यांच्या पोटसुळाने देशातील सुशिक्षित युवक बेरोजगार म्हणून आपली संख्या दिवसेंदिवस वाढवत आहे. हा विचाराचा आणि कृतीचा विरोधाभास नव्हे काय?आजची देशातील परिस्थिती पाहता आपण ‘मनुस्मृती’तील जीवन पद्धतीच्या जवळ चाललो आहोत व ती सर्वांच्या दृष्टिक्षेपात आली आहे याची जाणीव नक्कीच सर्वाना होत आहे. या सर्व मांडणीत ‘निर्विकार विचाराच्या धर्माचे’ नव्याने बिजांकुरण, पालन-पोषण व वृद्धीकरण करण्यात कोणी खारीचा तर कोणी सिंहाचा वाटा उचलताना दिसत आहेत. कारण त्यांना वाटते मागील ७५ वर्षात बहुजनांनी त्यांच्याशी बरोबरी केली. आता त्यांचा काळ संपलाय पुन्हा ‘रोटेशन’ सुरू करण्याची वेळ आली आहे. जातीयतेच्या महारोगाने पछाडलेले बहुजनातीलच स्वघोषित उच्चतम व ‘द्विज्यां’च्या पार निच्च असलेले ‘हे’ धर्माच्या ठेकेदारांना ‘ह्या’ ची आठवण करून देत आहेत. पण येणारा काळ ‘त्यांच्या’ सह ‘यांना’ पण गिळणार असल्याची त्यांना सध्या तरी कल्पना आहे. थोडक्यात म्हणजे ‘नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी झाली पाहिजे.’ ही धारणा त्या बहुजनाची झाली आहे.
आज देशातील पुरोगामी विचाराचे राज्य ‘महाराष्ट्र’ म्हणून ओळखले जाते. आणि हा ‘महाराष्ट्र’ ज्या मुंबईमुळे जगभरात ओळखला जातो. ती मुंबई महाराष्ट्रात रहावी म्हणून अनेकांनी आपले संसार,आयुष्य, व्यवहार उध्वस्त होईपर्यंत लढा लढला, बलिदान दिले त्याचा विसर आज सर्वांनाच पडला आहे. मुंबईसाठी आपापल्या परीने आहूती देताना कुणी घामाची, कोणी रक्त सांडले तर कोणी रक्ताची शाई व तोंडाचा भोंगा करुन बोटातून रक्त सांडपर्यंत डफावरील थापाच्या माध्यमातून पायाला भिंगरी बांधून मराठी अस्मितेची मशाल म्हणजेच ‘मुंबई’ पेटवली.
शाहीर अमर शेख, दत्ता गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई महाराष्ट्रातच राहावे यासाठी ‘लाल बावटा’ या जनजागृतीच्या कलापथकाची निर्मिती केली. या माध्यमातून अण्णाभाऊंनी केवळ साम्यवाद व स्वातंत्र्याचा जागरच केला नसून १९५० च्या दशकात उच्चवर्णीयांच्या वाढलेल्या वर्चस्वाल स्वातंत्र्योत्तर संधेला १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबईमध्ये वीस हजार लोकांच्या मोर्चातील ” *ये आजादी झुटी है, देश की जनता भुकी है* “! असा गजर करून गरिबांसाठी असलेल्या या आभासी स्वातंत्र्याची ओळख देशासह जगाला करून दिली.यानंतर याच कलापथकाच्या माध्यमातून *माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया कायली* या व अनेक प्रसिद्ध कवणातून ‘मुंबई’ महाराष्ट्राचीच आहे हे छातीठोकपणे सांगितले. पण आज अराजक भांडवलदारांना व स्वार्थी, भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यां सह याचा विसर अनेकांना पडला असला तरी याचा ‘मुंबईच्या मातीला विसर नाही’.
भारत ही ‘माता’ मानणाऱ्या देशात स्त्रियांचा केलेला ‘पाशवी विटंबना’ ही ‘भारतमाता’ म्हणून वल्गना करणाऱ्या राष्ट्राच्या रक्षकांना दिसत नाही का? अण्णाभाऊंनी त्यांच्या सर्व साहित्यात स्त्री-पुरुषांना समसमान आहेत. अन्यायशी लढण्यासाठी त्यांनी त्यांच्या साहित्यातील ‘स्त्री’ नायीकांच्या हातात तलवारी, बंदूक दिल्या, अधिकार दिले. ‘स्त्री इभ्रतीची’ जीवापाड जपवनूक करणाऱ्या अनेक नायकांची वर्णने त्यांच्या साहित्यात वाचायला मिळतात. मराठी साहित्याच्या कोणत्याही प्रकारात कोणत्याही लेखकाने अण्णाभाऊ इतकी पवित्र,शीलवान ‘स्त्री’ निर्माण केली नाही. कदाचित ‘ती’ची उच्चता त्यांच्या विचारशक्ती पलीकडे असावी म्हणून प्रयत्न जमला नसावा.
त्यांच्या अखेरच्या साहित्यप्रवासात त्यांनी *जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव* या विचारातून मार्क्सवादाकडून आंबेडकर वादाकडे परिवर्तन केले. परंतु आज तथाकथित भारतीय अज्ञानी आंबेडकरांना कायदे पंडित मानत असले तरी अर्थतज्ञ म्हणून उपेक्षितात तसेच आज आंबेडकरवादी अण्णाभाऊंना कम्युनिस्ट,मार्क्सवादी म्हणून उपहासतात.
अण्णाभाऊ चा साहित्यप्रवास हा ‘अक्षर ओळखी पासून आंतरराष्ट्रीय लेखक’ ईथपर्यंतचा प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या या साहित्यातून मानवाच्या प्रत्येक जीवनस्थीत्यांतरात जगणाऱ्या व्यक्तीला लढण्याची प्रेरणा मिळते. म्हणून आज प्रत्येक वाचकाला, साहित्यिकाला, व्यक्तीला कधी नव्हे ईतकी त्यांच्या साहित्याची प्रकर्षाने आठवण होत आहे.
गंगाप्रसाद भिसे, रा.उस्माननगर
सहशिक्षक
मो.७३ ८७ ४३ ६०२६ .
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त हा लेख लिहीला आहे. तरी आपल्या पेपरला लेख लावणे ही नम्र विनंती.