
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : भाजपच्या वतीने विभाजन विभिषिका स्मृति दिनानिमित्ताने अंजनगाव सुर्जी शहरात जिल्हाध्यक्ष तथा खा.डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.१४) मूक मोर्चा काढण्यात आला.श्रीराम मंदिर येथून मुक मोर्चाची सुरवात करण्यात आली.तसेच पानअटाई येथे फाळणीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या हजारो भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करून मूक मोर्चाचा समारोप करण्यात आला.देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी देशाची फाळणी झाली होती.या फाळणीमध्ये अनेकांना बेघर व्हावे लागले.अनेक जन आपले सर्व घरदार सोडून भारतात परतले होते.त्यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे या फाळणीच्या वेदना कायम असल्याने भाजपच्या वतीने विभाजन विभिषिका स्मृतिदिन पाळून अंजनगाव सुर्जी येथे मूक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात भाजप कार्यकर्त्यांबरोबरच शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी फाळणीवर भाषण केले.या भाषणात त्यांनी फाळणीपूर्व स्थिती व फाळणीनंतर देशावर झालेले परिणाम यावर भाष्य केले.त्यानंतर फाळणीमध्ये हौतात्म्य पत्करलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या मुक मोर्चामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार डॉ.अनिल बोंडे,माजी आमदार रमेशजी बुंदिले,विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांच्या समवेत भाजपाचे पदाधिकारी,मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांबरोबर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.