
गावभेटीची माहिती देणे तलाठ्यांना आता बंधनकारक… दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नादेड (देगलूर): देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या कागदपत्रांच्या उपलब्धतेसाठी तलाठी भेटत नाही किंवा त्यांचा फोन बंद असल्याने तो नेमका कुठे आहे, यांचा थांगपत्ता लागला नाही अशी ओरड नेहमीच ऐकिवात येत असते. तलाठ्यांना आता आपल्या गावभेटीची, नियोजीत कार्यक्रमांची माहिती व आपला मोबाईल नंबर देखील संबंधीत ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर द्यावा लागणार आहे. राज्य शासनाने नुकताच अशा आशयाचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. शासनाच्या या परिपत्रकाची संबंधीत तलाठी तसेच त्यांचे नियंत्रक अधिकारी यांच्याकडून अंमलबजावणी होते किंवा नाही हे येणाऱ्या काळात दिसून येणारआहे.देगलूर तालुक्यातील सात मंडळात एकेचाळीस तलाठी सज्जे आहेत. राज्यात जवळपास ५ ते ६ हजार तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. एका तलाठ्याकडे २ किंवा ३ सज्जांचा कार्यभार आहे. देगलूर तालुका देखील या परिस्थितीला अपवाद नाही. सज्जा किंवा गावभेटीचे सोडा परंतु देगलूर तालुक्यातील बहुतांश तलाठी देगलूर शहरात देखील वास्तव्यास राहत नाहीत, मुलांचे उच्चशिक्षण किंवा अन्य कारणाने नांदेड येथूनच येणे जाणे करीत असल्याची माहिती समोर येत आहे.
शेतकऱ्यांशी सबंधीत मोबाईल अॅप द्वारे इ. पीक पाहणी, अतिवृष्टी, अवर्षण, नैसर्गिक आपत्ती, नुकसानीचे पंचनामे, आपत्कालीन प्रसंगी पुनर्वसन व मदत यासाठी तलाठी संबंधीत सज्जा किंवा गावी जात नाहीत अशा तक्रारी असल्यावरून महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी शीतल माने यांच्या स्वाक्षरीने दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले असून तलाठ्यांनी आपल्या सज्ज्याच्या मुख्यालयी उपस्थित राहणे व गावभेटीचा नियोजित कार्यक्रम, दौरा याची माहिती संबंधीत ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर देणे बंधनकारक केले आहे. ही माहिती त्याने मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांच्याकडे देखील देणे अनिवार्य केले आहे. तलाठ्याच्या दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक सूचना फलकावर दर्शनी भागात ठळकपणे दिसेल अशा स्वरूपात लावावा लागणार आहे. या परिपत्रकाचा परिणाम कसा दिसेल, तलाठ्याचा शोध घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची पायपीट थांबेल काय हे लवकरच जनतेस अनुभवास येणार आहे.