
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवाली, ता.अंबड, जि. जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हीडीओतून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येतो.
मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होतो आहे.
मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन प्रकरणातील ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार काहीच करत नसल्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे…