गुंतवणूकदारांनी कमावले 1.57 लाख कोटी…
मुंबई : मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीनंतर आज बुधवारी बाजारात तेजी दिसून आली. दिवसभरातील नीचांकी पातळीवरून बाजार सावरला आणि वधारत बंद झाला. आजही मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेक्टरमधील स्टॉक्समध्ये विक्रीचा जोर दिसून आला.मात्र, बाजारातील व्यवहार बंद होण्यापूर्वी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसून आला.
आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 246 अंकांनी वधारत 67,467 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 77 अंकांच्या तेजीसह 20,070 अंकांवर बंद झाला. पहिल्यांदाच निफ्टी निर्देशांक 20 हजार अंकांच्यावर बंद झाला. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीने 20 हजार अंकांचा टप्पा गाठला होता. मात्र, 20 हजार अंकांखाली बंद होत असे.
कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार ?
आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. निफ्टी बँक 400 अंकांच्या उसळीसह बंद झाला आहे. याशिवाय फार्मा, मेटल्स, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर ऑटो आणि आयटी सेक्टरमधील शेअर दरात घसरण दिसून आली आहे. निफ्टी मिड कॅप तेजीसह बंद झाला. पण दिवसभरात निर्देशांक 570 अंकांनी घसरला होता. स्मॉल कॅप निर्देशांकातही विक्रीचा दबाव दिसून आला. पण दोन्ही निर्देशांक वधारत बंद झाले. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 20 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 कंपन्यांपैकी 31 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांनी 1.57 लाख कोटी कमावले…
मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 13 सप्टेंबर रोजी 320.23 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 12 सप्टेंबर रोजी 318.66 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.

2144 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ…
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) आज, बहुतांशी कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झालेत. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,784 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2144 शेअर्स तेजीसह बंद झाले. 1514 कंपन्यांच्या शेअर्सच्या दरात घसरण दिसून आली. तर 126 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. त्याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 148 शेअर्सने त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 23 कंपन्यांच्या शेअर्सने त्याचा 52 आठवड्यांचा नवीन नीचांकी दर गाठला.
