
दैनिक चालु वार्ता
उपसंपादक मोहन आखाडे छत्रपती संभाजीनगर
कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना म्हटले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाहीच असं म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हे वक्तव्य केले असल्याने यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. पण आंदोलकांची मागणी ओबीसीमधून आरक्षण देण्याची आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, “समाजाची दिशाभूल होता कामा नये. जरांगे पाटील यांची मागणी काय आहे, ज्यांची नोंदी पूर्वी निजामकालीन असतील. ज्यांच्यावर कुणबी नोंद असेल आणि नंतर ती बदलली असेल तर त्याचा सर्व्हे केला पाहिजे. अशा लोकांची माहिती मिळवली पाहिजे आणि खरच कुणबी असेल तर त्याला ओबीसी यांना देखील काहीच आक्षेप नाही. पण, त्यांचा सरसकट मराठ्यांना दाखला देण्यावर आक्षेप आहे. तसेच अशी कोणतेही भूमिका, कोणताही विचार राज्याची नाही की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येईल. ओबीसी समाजाचा आरक्षण आहे तेवढंच ठेवून, मराठा समाजाचे रद्द झालेलं आरक्षण मिळवून देण्याची मागणी मराठा समाजाची आहे.
त्यामुळे ते आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, यासाठी सरकारचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.”
नाना पटोले यांच्यावरही टीका
जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सांगण्यावरुन उपोषण केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. दरम्यान यावर बोलताना शिंदे म्हणाले की, “नाना पटोले यांना सध्यातरी कोणीही गांभीर्याने घेत नाही.
त्यामुळे त्यांची तडफड आहे की, असा काहीतरी गंभीर आरोप केल्यावर त्यांची दखल घेतली जाईल. नाना पटोले माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे की, यामध्ये एकनाथ शिंदे यांचा किंचित तरी हात आहे का?, पोटात एक आणि ओठावर एक असे मी काम करत नाही.”