प्रतिनिधी/राखी मोरे
दैनिक चालु वार्ता/पुणे
घरामध्ये वसतिगृह चालवणार्यांना आता व्यवसायिक स्वरूपाचा मिळकत कर महापालिकेला भरावा लागणार आहे. यासंदर्भाचा प्रस्ताव महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे.
शहरात उच्च शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी निवासी मिळकतींमध्ये कॉट बेसिसवर राहायला असतात. यातून मिळकतकधारकास चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे अशा मिळकतींना बिगरनिवासी मिळकतकर आकारला जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर केल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन केलेल्या तपासणीत संबधित ठिकाणी खोल्यांमध्ये बेड टाकून हाॅस्टेल चालवले जात असल्याचे समोर आले आहे. तर अनेकांनी थेट इमारतच हाॅस्टेल केली आहे. मात्र, कर निवासी दराचा आहे.महापालिकेच्या कर आकारणी नियमावलीत हाॅस्टेल, पेइंग गेस्ट, गेस्ट हाऊस तसेच सर्व्हिस अपार्टमेंंटसाठी स्वतंत्र नियमावली नाही. त्यामुळे, प्रत्येक तक्रारीची तपासणी करण्यापेक्षा या पुढे हाॅस्टेल, पेइंग गेस्ट, गेस्ट हाऊस तसेच सर्व्हिस अपार्टमेंंटला व्यावसायिकदराने कर आकारणी करण्याचा निर्णय कर संकलन विभागाने घेतला असून त्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार शहरात १० ते १५ हजार अशा मिळकती आहे.
तसेच अनेक फ्लॅट हे विद्यार्थ्यांना भाड्याने देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा मिळकतींना निवासी कराऐवजी बिगर निवासी कर लावला जाणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीला सादर झाला आहे. त्यामध्ये पेइंग गेस्ट ठेवताना निवासी ऐवजी व्यावसायिक कर लावा, जीएसटीतून सूट मिळणार नाही असे निर्णय लखनौ तसेच बंगलोर खंडपीठाने दिले असल्याचा संदर्भही या प्रस्तावात नमूद केला आहे.
‘शहरात निवासी मिळकतीमध्ये वसतीगृह, पेइंग गेस्ट ठेवले जातात. हा निवासी वापर नाही, त्यामुळे अशा मिळकतींना बिगर निवासी कर लावला जाणार आहे. सध्या ५० टक्के मिळकतधारक बिगर निवासी कर भरत आहेत, पण यावर काही जण आक्षेप घेत असल्याने यासंदर्भातील धोरण मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवले आहे.’