भाजप सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न महागाई बेरोजगारी सोडविण्यात अपयशी – दत्ताभाऊ शेंबाळे
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा – कंधार मतदार संघात गत २५ वर्षांपासून जनसंपर्काचे दाट जाळे असलेले भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव, तसेच लिंगायत समाजातील सक्रिय व सर्वजातीधर्माला घेऊन चालणारे समावेशक ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ शेंबाळे फुलवळकर यांनी नुकताच मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या व एकनाथ दादा पवार उपस्थितीत शिवसेनेमध्ये आपल्या निष्ठावंत समर्थकांसोबत प्रवेश केला.यावेळी खा.संजय राऊत यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील भाजपाला घरघर लागली असल्याचे चर्चिले जात आहे.
दत्ताभाऊ शेंबाळे यांच्या या प्रवेशामुळे जुन्या व नव्या शिवसैनिकात (उबाठा)आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्ताभाऊ शेंबाळे हे आपले अर्थ्याला अधिक आयुष्य शिवसेना वाढवण्यात वेचले होते. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.पण सध्याच्या परिस्थितीत भाजपच्या शेतकरी, महागाई, बेकारी यासह विविध धोरणामुळे त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत एकनाथ दादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे कंधार व लोहा तालुक्यात स्वतःला राजकीय धुरंदर व प्रस्थापित नेते म्हणवून घेणाऱ्या भल्या भल्या नेत्यांना आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हादरे बसणार असल्याचे चर्चिले जात आहे.
या वेळी शिवसेनेचे आ.सचिन आहेर, राज्य संघटक एकनाथ दादा पवार ,सोशल मीडियाच्या समन्वयक आयोजक आयोध्या पौळ, नायगाव तालुका संघटक राजेश लंगडापुरे यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी दत्ताभाऊ शेंबाळे फुलवळकर यांच्या सोबत भाजपाचे लोहा तालुका सरचिटणीस प्रकाश पाटील,संदीप मंगनाळे यांनीही शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला.
गाव तेथे शाखा स्थापन करणार – दत्ताभाऊ शेंबाळे…
यावेळी दत्ताभाऊ शेंबाळे फुलवळकर यांनी कंधार लोहा मतदार संघात पुन्हा एकदा नव्या जोमाने व तेवढ्याच ताकदीने शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात गाव तेथे शाखा स्थापन करून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले.
