
दै.चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
छत्रपती संभाजीनगर- मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचे आंदोलन यशस्वी ठरल्याच्या मुद्यावर वैजापूर शहर व वैजापूर तालुक्यातील गावामधील मराठा बांधवांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना व त्यांच्या सगेसोयऱ्यांना मराठा आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचीही ग्वाही दिली आहे.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतत्वात आंदोलनाचा लढा सुरू आहे. २० जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून पायी मोर्चा सुरु झाला होता. आरक्षण मिळेपर्यंत मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची गर्जना जरांगे पाटील यांनी केली होती. त्यांचा मोर्चा वाशीपर्यंत पोहोचला होता. पण आंदोलनाची तीव्रता बघता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने वेगाने सूत्रे हलवली. जरांगे यांच्या मागण्या काय आहेत, त्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी बैठक बोलावली व निर्णय घेतला.याबाबत त्यांनी स्वतः वाशी येथे जावून आंदोलकांशी चर्चा केली. सरकार मराठा आरक्षण देणार, सगेसोयऱ्यांना याचा लाभ मिळेल. ५७ लाख नोंदी सापडल्या त्यांना जातीचे प्रमाणपत्र दिले जातील, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, आदी मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे जरांगे यांनी आंदोलन स्थगित केले आहे. आंदोलनाचे हे यश असल्याने वैजापूर शहर तालुक्यातील गावागावात मराठा बांधवांच्या वतीने फटाके फोडून, गुलाल उधळून, पेडे वाटून जल्लोष करण्यात आला, मनोज पाटील जरांगे यांच्या नावाचा जयघोष केला. देत कसे नाही घेतल्या शिवाय राहत नाही. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणा देऊन वैजापूर शहर व वैजापूर तालुक्यातील गावांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.