
जालना प्रतिनिधी:आकाश माने
जालना : काळानुरुप अनेक तरुणाई ही आपल्या नितीमूल्य तसेच संस्कारांपासून दूर जाताना दिसत आहे. अनेक तरुण लग्न झाल्यानंतर आपल्या वृद्ध माता-पितांना वाऱ्यावर सोडून देतात. तर काहीजण त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतात . लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे आई-वडील आपल्या मुलांना जपत असतात. मात्र, मोठे झाल्यानंतर हीच मुले कृतघ्न होतात आणि आपल्या आई-वडिलांना सांभाळण्यास नकार देतात.
अशीच एक घटना जालना शहरात समोर आली. जालना शहरातील सेंट मेरी हायस्कूल जवळील महादेव मंदिरापाशी एक वृद्ध महिला बेवारस स्थितीमध्ये आढळून आली. ही बाब लक्षात येताच सदर बारा बाजार पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक पंकज जाधव यांनी मदतीचा हात पुढे करत या महिलेला जालन्यातील आधार केंद्रात दाखल केले.
*पोलिसांना मिळाली होती माहिती -*
जालन्यातील सेंट मेरी शाळेजवळ एका 70 वर्षीय वृद्ध महिलेला तिच्याच मुलाने अनाथपणे सोडले आणि तो तिथून निघून गेला होता. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना कळाली. त्यावरून त्यांनी पीएसआय भगवान नरोडे, पोलीस हवालदार जगन्नाथ जाधव आणि पोलीस शिपाई कल्पेश पाटील यांना माहिती दिली.
*पोलीस अधिकारी यांच्या संवेदनशील स्वभावाचे दर्शन –
सदर महिलेस मदतीचा आधार देण्यासाठी जालना शहरातील आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र वृद्धाश्रम या ठिकाणी दाखल करण्यात आले. या आधार केंद्रात या वृद्ध महिलेची पुढील सर्व काळजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने पोलीस उपनिरीक्षक पंकज जाधव यांच्या संवेदनशील स्वभावाचे दर्शन होत आहे. या निमित्ताने खाकी वर्दीतील माणुसकीचे व संवेदनशील मनाचे दर्शन झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे