
चालु वार्ता प्रतिनिधी :पुणे/पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
श्री संत जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगरावर (ता. खेड) मुलीसोबत येथे येऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला आध्यात्मिक अभ्यास करणाऱ्या वारकरी साधकाने हटकल्याने संबंधित तरुणांच्या टोळक्याकडून साधकास गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने भामचंद्र डोंगर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
चाकण औद्योगिक क्षेत्राच्या लगत वासुली (ता. खेड) गावच्या हद्दीत असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य साधक या ठिकाणी वर्षांनुवर्षे राहून अभ्यास करतात. आजही या ठिकाणी जवळपास ३० ते ४० विद्यार्थी अभ्यास करतात.
परंतु, रविवारी (दि. १६) एक तरुण मुलगा आणि मुलगी येथे आल्यानंतर त्यांचे अश्लील चाळे सुरू होते. यावरून साधक कुलदीप शिवगोंडा खोत या अभ्यास करणाऱ्या वारकरी विद्यार्थ्याने त्यांना हटकले असता, त्या तरुणाने अभ्यास करणाऱ्या साधकाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि संध्याकाळी पुन्हा मित्रांना बोलावून गंभीर मारहाण केली.
यामध्ये साधक विद्यार्थ्यांचा पाय मोडला असून, त्याच्या सोबतच्या एका विद्यार्थ्यालादेखील जखमी केले आहे. या साधकावर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेचा भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने निषेध केला असून, या तरुणांच्या टोळक्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. भामचंद्र डोंगर येथे नेहमी तळीराम आणि प्रेमीयुगूल वावरत असतात. त्यांच्याकडून यापूर्वी देखील अनेक साधकांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. भामचंद्र डोंगरावर अभ्यास करणाऱ्या साधक वारकऱ्यांच्या मनात या घडलेल्या गंभीर घटनेनंतर भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी चार आरोपींना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पंचक्रोशीतील नागरिकांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला असून, मारहाण करणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते केली आहे
प्रतिक्रिया…….
भामचंद्र डोंगराला श्री संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते. येथील आध्यात्मिक वातावरण खराब होऊ नये, यासाठी पोलिसांकडून गस्त पथक आहेत व वासुली फाट्यावर पोलीस मदत केंद्र आहे आमच्या वाहतूक पोलीस व कर्मचारी रात्री बे रात्री गस्त ठेवण्यात आले आहे .
नागरिकांना वासुली पोलीस मदत केंद्र २४तास कर्मचारी असतात अनुचित प्रकार सारखं घटना वाटत असल्यास संपर्क करावा
नितिन गिते
निरीक्षक एमआयडीसी महाळूंगे पोलीस स्टेशन