
दै.चालु वार्ता, प्रतिनिधी
अशोक कांबळे
गारगोटी: सत्तेचे सगळे लाभ घेणारे के. पी. पाटील सध्या प्रभाकर पणशीकरांच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकातील लखोबा लोखंडेची भूमिका बजावत असल्याचा आरोप आ. प्रकाश आबिटकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
21 जून रोजी ‘बिद्री’ कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘ बिद्री साखर कारखाना ‘ आमची मातृसंस्था आहे. त्यामुळे तिची बदनामी करणे आमची संस्कृती नाही. के. पी. पाटील यांनी बिद्री कारखान्याच्या बाबतीत अनेक चुकीचे निर्णय घेतले. यामध्ये डिस्टिलरी प्रकल्प उभारताना परवानगी न घेताच बँकेकडून दीडशे कोटींचे कर्ज बेकायदेशीररीत्या उचलले; मात्र त्याबद्दल आम्ही कधीही वरिष्ठ पातळीवर तक्रार केली नाही. त्यामुळे पाटील यांच्याकडून होत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. सत्तांतरानंतर आमच्यावर आरोप करणारे पाटील मात्र वर्षभरानंतरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सत्तेत सहभागी झाले. सत्तेचे सगळे लाभ त्यांनी घेतले. शक्तिपीठ मोर्चात त्यांनी आमच्यावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत. ज्या सरकार वर ते ‘शक्तीपीठ’ मार्गाच्या विरोधात टीका करत आहेत, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ते त्या सरकारमध्ये सहभागी होते. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भूमिका बदलत आहेत. त्यांनी गद्दारी,५० खोके एकदम ओके तसेच मतदारसंघाला लागलेला कलंक पुसण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे आरोप आमच्यावर केले आहेत.
परंतु याच राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने १० वर्षांपूर्वी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे, हे के. पी. पाटील यांना पाहवत नसल्यामुळेच बिद्रीवरील कारवाईमध्ये माझे नाव विनाकारण गोवण्याचे काम करत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.