
पुणे : देवळाली मतदारसंघ कोणाला यावरून शिवसेना ठाकरे पक्षाने नवा वाद निर्माण केला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील जागा वाटपावरून महाविकास आघाडीत स्फोट घडावा, अशी स्थिती निर्माण झाल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.
देवळाली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आला होता. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. ते मतदार संघ राष्ट्रवादीला देण्यात येणार आहेत. हे जागा वाटपाचे मूलभूत सूत्र आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात देवळाली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला होता. येथे उमेदवार निवडीची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली होती. मात्र अचानक शिवसेनेने त्यात उडी घेतली आहे.
या संदर्भात खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या काल रात्री उशिरापर्यंत चर्चेच्या फेरी घडल्या. यामध्ये अगदी इच्छुकांना सुद्धा ताण पडावा असा वाद झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन आणि काँग्रेस पक्षाची एक अशा तीन मतदारसंघांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केलेला आहे. त्यात चौथ्या देवळाली मतदारसंघाची भर काल पडली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये त्यावरून बरीच वादावादी झाली. यामध्ये देवळाली आणि भूम परांडा हे मतदार संघ देखील होते.
ही चर्चा बरीच लांबल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशिक शहरातील चार पैकी दोन मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आले आहेत. त्यावरून अधिक महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष नाराज आहे.वस्तुतः नाशिक मध्य मतदार संघाची जागा शिवसेनेला द्यावी की नाही, हा निर्णय झालेला नव्हता. मात्र शिवसेना ठाकरे पक्षाने थेट उमेदवारांना एबी फॉर्म दिले. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला. आता नाशिक मध्य मतदार संघात सांगली पॅटर्न राबविला जाण्याची चर्चा होत आहे.
पार्श्वभूमीवर देवळाली मतदारसंघाविषयी काय करायचे? त्या बदल्यात कोणता मतदारसंघ देता येईल? या पासून तर शिवसेना ठाकरे गटाला अडचणीत आणणारी गुगली जयंत पाटील यांनी काल रात्री टाकली.
त्यानंतर ते थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इस्लामपूरला रवाना झाले. आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाणे येथे गेले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्षातील चर्चा जैसे थे राहिली.आता याबाबत आज संध्याकाळी उशिरा निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराबाबत त्यांनी विविध माहिती आणि आक्षेप सांगितले. शहरातील चार पैकी दोन जागा आधीच सोडलेल्या असताना तिसरी जागा शिवसेना ठाकरे पक्षाला सोडायची का? यावरून वादाचा एक नवा अंक सुरू झाला आहे. यामध्ये शिवसेनेची भूमिका लक्षात आल्यावर आता या विषयावर थेट ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात संपर्क होणार आहे. त्यानंतर देवळाली मतदारसंघाचा निकाल लागेल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.