
टाटा मोटर्सने Q2FY25 निकालांमध्ये 3,343 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी घसरला आहे. नफ्यात ही घसरण कंपनीच्या जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) आणि कमर्शियल व्हेईकल सेगमेंटच्या विक्रीत घट झाल्यामुळे झाली आहे.
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत. विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला होता की टाटा मोटर्सचा महसूल 1.05 लाख कोटी रुपये असेल आणि निव्वळ नफा 32 टक्क्यांनी वाढून 4,968 कोटी रुपये होईल.
परंतु वास्तविक आकडेवारी या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. कंपनीचा EBITDA देखील 230 बेसिस पॉईंट्सने घसरून 11.4 टक्क्यांवर आला आहे. टाटा मोटर्सने भविष्यात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही नजीकच्या काळातील देशांतर्गत मागणीबाबत सावध आहोत, सणासुदीचा हंगाम आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे,” असे कंपनीने म्हटले आहे.
या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी टाटा मोटर्सचे शेअर्स शुक्रवारी 2 टक्क्यांनी घसरले आणि NSE वर 803.55 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 3 लाख कोटी रुपये आहे, परंतु ऑगस्टपासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 31 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
जग्वार लँड रोव्हरचा महसूल 5.6 टक्क्यांनी घसरून 6.5 अब्ज पौंड झाला. ॲल्युमिनियमच्या पुरवठ्यात तात्पुरता व्यत्यय आल्याने आणि 6,029 वाहनांची गुणवत्ता तपासणी यामुळे कंपनीच्या नफ्यालाही फटका बसला.
तसेत देशांतर्गत व्यावसायिक वाहनांचा महसूल 13.9 टक्क्यांनी घसरून 17,288 कोटी रुपयांवर आला आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाची मंद गती आणि खाणकामाचा अभाव यामुळे कंपनीच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. कंपनीचा प्रवासी वाहन महसूल देखील 3.9 टक्क्यांनी घसरून 11,700 कोटी रुपयांवर आला, परंतु EBITDA मार्जिन 6.2 टक्क्यांवर स्थिर आहे.