
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागायला आता काही तास शिल्लक आहे. अशा वेळी सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती निवडून येवू शकतात अशा अपक्षांच्या संपर्कात आहेत.
त्यांच्याकडे पाठिंबाही मागितला जात आहे. त्यामुळे अशा अपक्षांचा भावही वधारला आहे. त्यात नांदगाव विधानसभा मतदार संघात महायुतीत बंडखोरी करणारे समिर भुजबळ यांचा ही समावेश आहे. समिर भुजबळ यांनी आपण नक्कीच विजयी होवू असा विश्वास व्यक्त केला आहे.
नांदगावची जनता बदल घडविणार आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी केला आहे. भयमुक्त नांदगाव व प्रगत नांदगावची टॅग लाईन घेवून ही निवडणूक लढवली होती असं भुजबळ म्हणाले. नांदगावच्या जनतेने मोठ्या प्रमाणावर बदल घडविण्यासाठी मतदान केलं आहे. त्यामुळे मतदार संघात बदल घडणार हे निश्चित आहे असंही ते म्हणाले.
कार्यकर्त्यांकडून पॉझिटिव्ह फिडबॅक मिळत आहे. त्यामुळे मुळे बूथ निहाय आलेली आकडेवारी नुसार विजय नक्की आहे असंही ते म्हणाले. दरम्यान जे अपक्ष जिंकण्याची शक्यता आहे, त्यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून संपर्क केला जात आहे. मात्र आपल्याला कोणीही संपर्क केला नाही असे भुजबळ यावेळी म्हणाले. सध्या सर्वांनाच निकालाची प्रतिक्षा असल्याचं ते म्हणाले.
नांदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे हे मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात समिर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आहे. भुजबळांनी या जागेवर दावा केला होता. पण महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली. त्यामुळे भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या मतदार संघात भुजबळ आणि कांदे यांच्यात चुरशीची लढत होत आहे.