
विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर 5 कोटी रुपये वाटल्याचे आरोप झाले. विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये होते, त्या हॉटेलवर बहुजन विकास आघाडीचे नेते क्षीतिज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली, यानंतर मोठा गदारोळ माजला होता.
पाच ते सहा तास या हॉटेलमध्ये विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये गोंधळ सुरू होता. अखेर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या गाडीतून विनोद तावडे हॉटेलमधून बाहेर गेले.
विनोद तावडे यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत, पण विरोधकांकडून मात्र त्यांच्यावर वारंवार टीका करण्यात येत आहे. यामुळे आता विनोद तावडे यांनी विरोधी पक्षामधल्या नेत्यांना नोटीस पाठवली आहे. बिनशर्त माफी मागा अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकणार, असा इशारा विनोद तावडे यांनी दिला आहे.
विनोद तावडे यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि सुप्रिया सुळे यांना नोटीस बजावली आहे. 24 तासात बिनशर्त माफी मागा, अन्यथा 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार, असा इशारा विनोद तावडे यांनी या नोटीसमधून दिला आहे. 5 कोटी रुपये वाटल्याचे आरोप केल्याप्रकरणी तावडेंनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि सुप्रिया सुळे यांना नोटीस बजावली आहे.