
महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालावरून संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका
मुंबई : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद देण्यासाठी आरएसएसच नव्हे तर दिल्लीतील भाजपचाही विरोध आहे.
दिल्लीत तसा निर्णयही झाला आहे,”अशी प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. त्यांच्याकडे बहूमत आहे. इतकं मोठ बहूमत आहे की, ते दिल्लीतून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाठवू शकतात. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीतून निवडला जाणार, मोदी शहा निर्णय़ घेणार. तो मुख्यमंत्री असा असेल जो गुजरातचा फायदा करून देईल. तोच मुख्यमंत्री होईल, महाराष्ट्राच्या फायद्याची गोष्ट होणार नाही. पण तो त्यांचा निर्णय आहे. बहुमताच्या ताकदीवर ते कुणालाही मुख्यमंत्री बनवू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये असे निर्णय घेतले आहे.
मोदींजी आणि शाह साहेब जर देशाचे खरे नेते असते तर त्यांना असे करायची गरजच भासली नसती. हा पक्ष फोड तो पक्ष फोडा, हा आमदार खरेदी करा, तो आमदार खरेदी करा, अशी कामे कधी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी केली नाहीत, मनमोहन सिंग यांनी केली नाही. अशी कामे तीच लोक करतात जे मनातून आणि पक्षातही कमजोर असतात.
हे जे निकाल लागले आहेत ते तुम्ही ठेवा. पण महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका घ्या आणि त्याही बॅलेट पेपरवर घ्या आणि आम्हाला दाखवा की तुमचा निर्णय बरोबर होता. जर बॅलेटवर तुम्ही जिंकलात तर आम्ही हा निर्णय मान्य करू. पोस्टर मतदानातील बॅलेट पेपरचे निकाल पाहा त्यात आम्ही आघाडीवर होतो. पण एक तासातच आम्ही पिछाडीवर कसे आलो. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा होता. त्यांना आणि अजित पवार यांना ज्या पद्धतीने जागा मिळाल्यात ते पाहिलं तर हा कशा पद्धतीचा निर्णय आहे.असा संशय निर्माण होतो. असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नाना पटोलें राजीनामा देणार आहेत, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ” एकाच व्यक्तीवर खापर फोडता येणार नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. शरद पवार यांच्यापाठिशी संपूर्ण महाराष्ट्र उभा होतां, असं चित्र होतं. त्यांनाही अपयश आले. त्याची कारणे शोधली पाहिजेत. नाना पटोले, शरद पवार, आमचे नेतृत्त्व यांपैकी कोण जबाबदार आहे. यातून बाहेर पडून पराभवाची मुख्य कारणे शोधली पाहिजेत.
संजय राऊत म्हणाले, “ज्या पद्धतीने विरोधक निवडणूक लढले, त्याला मी पारदर्शक निवडणूक मानत नाही. आमचे कार्यकर्ते ईव्हीएम मशीनसंदर्भात बातम्या देत आहेत की,मतांचा आकडा मॅच होत नाहीतेय. अशा प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. असे अनेकजण आहेत ज्यांनी काल पक्ष सोडला, शिंदे गटात गेले आणि आमदार झाले, त्यांनी अशी कोणती महान कामे केली आहेत की ते दीड-दीड लाख मतांनी आमदार झाले. यात संशयाला जागा आहे. आश्चर्य म्हणजे शरद पवार यांनी आजपर्यंत कधीच अशी तक्रार केली नव्हती. अशी मशीनबाबत शरद पवारांनीही शंका व्यक्त केली आहे.