
राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने एकतर्फी बाजी मारत प्रचंड बहुमत मिळवले आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे. शिवसेना ठाकरे गटालादेखील राज्यात अवघ्या 20 जागांवर यश मिळाले.
त्यातील 10 जागा या मुंबईतील आहेत. तर, दुसरीकडे विधानसभा निवडणूक निकालानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेची वाट बिकट असणार असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
मुंबई महापालिका ही आशियातील सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे. मागील जवळपास 30 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यातील 25 वर्षही भाजपसोबतच्या युतीमधील आहेत. तर, 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेने बाजी मारली. पण, भाजपही काही जागांच्या अंतराने दुसऱ्या क्रमांकावर राहिला. आता, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीची वाट बिकट असणार असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
मुंबई महापालिकेत शहर आणि उपनगर असे दोन प्रशासकीय विभाग येतात. त्यातील मुंबई शहरात बहुसंख्य मतदार हे मराठी भाषिक आहेत. मात्र, मागील काही काळात त्यांची संख्या कमी होत आहे. तर, दुसरीकडे उपनगरातही बिगर मराठी मतदारांची संख्या वाढत आहे. मुंबईवर आणि विशेषत: मराठी भाषिक मतदार हा शिवसेना आणि मनसेसोबत राहिल्याचे चित्र असते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीने मात्र सगळ्याच आकड्यांमध्ये बदल झाला आहे
मुंबई शहरात कोणाला मतदान?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या निवडणुकीत मुंबई शहरात 13.39 लाख मतदारांनी मतदान केले. त्यापैकी 42 टक्के मते ही महायुतीच्या पारड्यात पडली. त्यात भाजपला 24.1 टक्के अर्थात 3,22 लाख, शिवसेना शिंदे गटाला 2.39 लाख मते मिळाली. शिंदे गटाला 17.9 टक्के मते मिळाली.
महाविकास आघाडीला मुंबई शहरात झालेल्या एकूण मतदानापैकी 43.8 टक्के मतदान झाले. शिवसेना ठाकरे गटाला 25.65 टक्के अर्थात 3.44 लाख मते मिळाली. तर, काँग्रेसला 2.44 लाख मते अर्थात 18.2 टक्के मते मिळाली. मनसेला 1.31 लाख मते मिळाली. मनसेने जवळपास 9.9 टक्के मते मिळाली.
मुंबई उपनगरात कोणाची सरशी?
मुंबई उपनगरात 43.65 लाख मतदान झाले. त्यापैकी भाजपला 31 टक्के मते मिळाली. शिवसेना शिंदे गटाला 17.8 टक्के, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2.6 टक्के मते मिळाली. अशी एकूण 51.3 टक्के मते मिळाली.
तर, महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला 22.6 टक्के मते मिळाली. काँग्रेसला 10.1 टक्के, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 2.2 टक्के मते मिळाली. अशी एकूण 34.9 टक्के मते मिळाली. मनसेला उपनगरात 6.31 टक्के मते मिळाली.
एकूण मुंबईचे चित्र काय?
विधानसभेसाठी मुंबईतील 36 जागांसाठी 56.74 लाख मतदान झाले. त्यापैकी भाजपला 29.3 टक्के मते मिळाली. शिवसेना शिंदे गटाला 17.8 टक्के, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 टक्के अशी महायुतीला एकूण 49.1 टक्के मते मिळाली.
तर, महाविकास आघाडीला 37 टक्के मिळाली आहेत. त्यात शिवसेना ठाकरे गटाला 23.3 टक्के, काँग्रेसला 12 टक्के, राष्ट्रवादी शरद पवार 1.7 टक्के मते मिळाली आहेत. मनसेला 7.2 टक्के मते मिळाली आहेत.
ठाकरेंसाठी बिकट वाट?
विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीसमोर महायुतीने तगडं आव्हान दिले आहे. मु्ंबईत मराठी मतांनी शिवसेना ठाकरे गटाला साथ दिल्याचे चित्र आहे. मात्र, मुंबईतील बिगर मराठी मतदानांपैकी फार कमी मते ठाकरे गटाकडे वळली. तर, दुसरीकडे बिगर मराठी मते ही भाजपकडे वळली असल्याची चर्चा आहे. असाच ट्रेंड मुंबई महापालिका निवडणुकीतही कायम राहिल्यास मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यास शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबई महापालिकेतून शिवसेना ठाकरे गटाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजप-शिवसेना शिंदे गट जोरदार प्रयत्न करणार आहे. मुंबईतील सत्ता गेल्यास उद्धव ठाकरे यांचे राजकीय अस्तित्वच पणाला लागणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी दोन्ही बाजूने होणार आहे.