
शिवसेनेत उभी फूट पडली. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं. पक्ष, चिन्ह, कार्यकर्ते, नेते, आमदार सोडून गेले. मात्र, लोकसभेला उद्धव ठाकरे सामोरे आणि 9 खासदार निवडून आणले
परंतु, विधानसभेला उद्धव ठाकरे यांना मोठा सेटबॅक बसला. ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त 20 आमदार निवडून आले. एवढे होऊनही शांत बसतील, ते ठाकरे कसले.
नवनिर्वाचित 20 आमदारांची मुंबईत बैठक बोलवण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे.
“ते फडण’वीस’ असले तरी आपण ‘वीस’ आहोत. आपण त्यांना पुरून उरू,” असा कॉन्फिडन्स उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याच वेळी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्यावर मोठी जबाबदारी सोपावण्यात आली आहे.
भास्कर जाधव यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रतोदपदी पुन्हा सुनील प्रभू यांना जबाबदारी दिली आहे. तर, आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे.