
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निकालानंतर विधानसभेतील कार्यकाळ संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी राज्यपाल महोदयांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला असून या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रभर शिवसैनिक भावनिक झाले आहेत, पुणे शहराचे शिवसेना शहर प्रमुख यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पुणे शहरातील एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून प्रमोद नाना भानगिरे यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात प्रमोद नाना भानगिरे म्हणतात की, साहेब तुमचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेला मान्य नाही, आज महाराष्ट्रातील तमाम जनता पुन्हा एकदा साहेबांना मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छिते आहे. कार्यकाळ संपल्यानंतर नियमाप्रमाणे राजीनामा द्यायचा असतो हे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाला ठाऊक आहेच, मात्र त्याही पेक्षा मनाची घालमेल जास्त आहे कारण, साहेब मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील कोट्यावधी शिवसैनिक मुख्यमंत्री असल्यासारखं आत्तापर्यंत जाणवत होतं.
अनेक शिवसैनिकांना वर्षा निवासस्थान म्हणजे दुसरे घर की काय, इतका सहज वावर तिथे करता येत होता, राज्यातील बळीराजा, माता -भगिनी,युवा उद्योजक, लाखो तरुणांची भावना एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत जोडल्या गेलेल्या आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राच्या जनतेवर एवढे भरभरून प्रेम करणारा मुख्यमंत्री जनतेने कधीच बघितला नव्हता. साहेब आपणच महाराष्ट्राचे तारणहार आहात, राजकारणातील सढळ हाताने मदत करण्याचा, दिलदार वृत्तीचा मुख्यमंत्री ही ओळख कोट्यावधी मराठीजनांमध्ये आजही ठसठशीतपणे जशीच्या तशी आहे.
सर्वकाही विधानमंडळातील नियमाप्रमाणे होत असलं तरीही शिवसैनिकांना प्रत्येक क्षण तुम्हीच मुख्यमंत्री हवे आहात.साहेब तुम्ही पुनश्च मुख्यमंत्री होणार हीच माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाची अंतर्मनातील भावना आहे. राजकारणात भावनिक होऊन चालत नसतं हे जरी तुम्ही आम्हाला शिकवलेलं असेल तरीही आज आई तुळजाभवानीची कृपा नक्की होईल हा माझा विश्वास आहे.
शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पत्रानंतर राज्यातील अनेक शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर CM 2.0 हा ट्रेंड चालवायला सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.