
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सहा दिवसानंतरही अद्याप महायुतीने मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट केलेलं नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात माझ्याकडून काही अडथळा नाही असं सांगितलंय
बहुमत असतानाही मुख्यमंत्री ठरला नसल्यानं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. विधानसभेचा निकाल हा जनतेचा कौल नाहीय. निकाल लागलेला आहे तो जनतेचा कौल आहे असं आम्ही मानत नाही असंही संजय राऊत म्हणाले.
पाशवी बहुमत असताना राज्याला सरकार नाही. विधानसभेची मुदत २६ तारखेला संपलीय. आम्ही इथं असतो तर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं असतं. नियम कायदे फक्त विरोधात असलेल्यांसाठी असतात. बहुमत प्राप्त झालेल्या या महायुतीला कोणताही नियम नाही. महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी आणि कोण मिळेल हा त्यांचा प्रश्न असल्याचं राऊतांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे यांनी दावा सोडला यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांना असा दावा कसा असू शकतो? यावर बोलायचं नाही. पण ते स्वत:ला शिवसेना समजतात आणि त्यांनी त्यांचे पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीतल्या मोदी शहांना दिले असतील तर यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये.
शिवसेना तुमच्या हातात निवडणूक आयोगाने दिलीय. मोदी शहांनी दिलीय. पण नाव शिवसेना आहे. त्या शिवसेनेचे निर्णयाचे अधिकार मोदी शहांना देत असाल तर बाळासाहेब ठाकरेंचा स्वाभिमान, अभिमान हे शब्द न वापरलेले बरे अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.
मविआतून शिवसेना ठाकरे गट वेगळा होणार नाही असंही राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं. राऊत म्हणाले की, निकाल आताच लागलेत, निकालसंदर्भात सर्वच पक्षांचं चिंतन, मंथन सुरूय. तिन्ही पक्षांना धक्का बसलाय. हे का, याची कारणं शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची दिशा पाहिली तर पैसे आणि ईव्हीएमकडे जातं. आम्हाला चर्चा करावी लागेल. राहुल गांधींसोबतही चर्चा केली. काही कार्यकर्त्यांची भूमिका असते की आपण स्वतंत्र लढायला पाहिजे होतो.
मुंबई महापालिका, राज्यातील १४ महापालिकांसदर्भात निर्णय़ आहे. त्याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. विधानसभेला आता ५ वर्षे आहेत. लोकसभेला मविआला फायदा झाला. विधानसभेला आम्हाला यश मिळालं नाही. त्या अपयशाची कारणं आम्ही शोधू. कारणं शोधण्यासाठी आम्हाला एकत्र बसावं लागेल. शांतपणे एकत्र विचार केला तर त्यासंदर्भात एकत्र बसूनच निर्णय घेऊ असंही राऊतांनी म्हटलं.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल पोस्ट करताना वैयक्तिक महत्त्वकांक्षेपेक्षा युतीधर्माचं पालन केल्याचं म्हटलंय. यावर राऊतांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देताना म्हटलं की, अडीच वर्षापूर्वी ते कसे मोहात पडले आम्ही पाहिलंय. बाकी मला माहिती नाही. त्यावर बोलण्यासारखं काही नाही. महाराष्ट्रात नवा मुख्यमंत्री मिळतोय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री निवडायचा अधिकार बहुमत असलेल्यांकडे, दोन पक्षांनी सर्वाधिकार दिल्लीला दिले आहेत. त्यामुळे ते ठरवतील.