काँग्रेसने शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे.
काँग्रेसने याच मुद्द्यावर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसने आरोप केला की, मतदान याद्यांमधून मनमानीपणे मतदारांची नावं काढण्यात आली आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १० हजारांपेक्षा जास्त मतदार जोडले गेले. शिवाय महाराष्ट्रातील मतदारांच्या याद्यांवर एका माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसने आपल्या पत्रामध्ये पुढे म्हटलं की, मनमानीपणे नावं काढणं आणि नावं लावणं यामुळे जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२४ यामध्ये महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये साधारण ४७ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
काँग्रेसने दावा केला की, ज्या ५० विधानसभा मतदारसंघांमध्ये साधारण ५० हजार नवीन मतदार जोडले गेले आहेत. त्यातल्या ४७ जागांवर सत्ताधारी महायुतीच्या पक्षांनी विजय मिळवला आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्रात ५८.२२ टक्के मतदान झालं होतं. त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता मतदान वाढून ६५.०२ टक्के मतदान झालं.
अंतिम रिपोर्ट आल्यानंतर ६६.०५ टक्के मतदान नोंदवलं गेल्याचं सांगण्यात आलं. मतमोजणी सुरु होण्याआधी काही तास हा आकडा घोषित करण्यात आला. पत्रानुसार, केवळ एक तासामध्ये म्हणजेच सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ७६ लाख मतदान झालं.
‘ईव्हीएम’वर घेतला आक्षेप
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दल अविश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्हाला ईव्हीएम मशीन नकोय, बॅलेट पेपर हवे आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये २८८ जागांपैकी २३० जागांवर महायुतीने विजय प्राप्त केला आहे. यात भाजने १३२ जागा जिंकल्या, शिवसेनेने ५७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४१ जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडने एकूण ४६ जागा जिंकल्या आहेत. यात काँग्रेसने केवळ १६ जागा जिंकल्या आहेत.
