महायुतीच्या बड्या मंत्र्यांचं सूचक वक्तव्य..!
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येत कराड यांचं नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे देखील अडचणीत आले आहेत. याप्रकरणावरून विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातूनही त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील केली जात आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. धनंजय मुंडेंची राजीनाम्याबद्दल त्यांनी एक सूचक विधान केलं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. महाजनांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो, असा अंदाज लावला जातोय. त्यामुळे आता धनंजय मुंडेंबाबत महायुती सरकार नेमका काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
धनंजय मुंडे यांनी अलीकडेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी आपल्या पदाचा पदभार देखील स्विकारला आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्यांच्या अडचणीत वाढ होत आहेत. आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील हे प्रकरण लावून धरलं आहे. त्यांनी याबाबतचा सगळा घटनाक्रम विधीमंडळाच्या अधिवेशनात सांगितला होता. बीडमध्ये कशाप्रकारे जंगलराज सुरू आहे, याचा खुलासा देखील धस यांनी केला आहे.
त्याचबरोबर बीडमधील गुन्हेगारीवरून सामाजिक नेत्या अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा बंदुक हातात असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित कुठे कुठे संपत्ती खरेदी केली आहे.
याचा तपशीलही दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. या सगळ्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी होऊ शकते, असं बोललं जातंय. या सगळ्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
