
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेला वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला आहे.त्यानंतर आता सीआयडीने त्याची चौकशी सुरू केली आहे. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर ज्यापद्धचीने त्याने स्वत:ला सरेंडर केले आहे
त्यावरुन विरोधकांनी टीका करत पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काल मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मिक कराड हजर होतो हा संशोधनाचा भाग आहे, असे म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी संशय व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये मोर्चा झाला. सीआयडचे यश नाही, आम्ही थोडा फार सरकारवर जो दबाव टाकला होता त्यातून हा मानसिक दबाव वाल्मीक कराडवर आला असेल. 22 दिवस आरोपी बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरतो. अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतो, पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल होतो.
वाल्मिक कराड हजर कसा काय झाला?
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, काल धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मिक कराड हजर होतो हा संशोधनाचा भाग आहे. वाल्मिक कराड सात आरोपींचा म्होरक्या आहे. त्याच्या नावाने 14 गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा बॉडी गार्ड घेऊन फिरतो. वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लागणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री यांनी आता वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावणार याबद्दल स्पष्टीकरण द्यावं.
धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला काही निरोप आला का?
माझी मुख्यमंत्री यांना विनंती आहे की धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री पद दिलं तर मुळीच देऊ नका. अजित पवारांना सुद्धा विचारायचे आहे की याविषयी तुम्ही एकदा ही बोलला नाहीत.22 दिवसांनंतर वाल्मिक कराडला कसा सरेंडर झाला. वाल्मिक कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही. काल चर्चा आणि आज सरेंडर केलं. धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मिक कराडला काही निरोप आला का? असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी केला आहे.