
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा विश्वासू साथीदार वाल्मिक कराड फरार झाला. गेली १५ दिवस गुन्हे अन्वेषण विभाग वाल्मिकचा शोध घेत होते, मात्र दडून बसलेला वाल्मिक सीआयडीच्या हाती लागत नव्हता.
अखेर मंगळवारी दुपारी वाल्मिकने पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पणाआधी आपल्यावरील आरोपांचे खंडन करतानाच संतोष देशमुखांच्या हत्येत जे दोषी असतील, त्यांनी फाशी द्या, अशी सांगणारी ध्वनीचित्रफित प्रसिद्ध करून वाल्मिक पोलिसांना शरण गेला. कराड पोलिसांच्या ताब्यात येताच राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचे अनेकांना नाव घेतले आहे तसेच त्याच्याकडे संशयाची सुई आहे. त्यामुळे दोन्ही गुन्ह्यात त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सोमवारी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केले, यावर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले.
सर्वपक्षीयांनी भूमिका घेतली, तपास योग्य पद्धतीने व्हावा
वाल्मिक दोषी नसेल तर पहिल्यादिवसापासून कशामुळे फरार झाले होते? असा सवाल करीत देशमुख हत्या प्रकरणाचा गंभीर गुन्हा महाराष्ट्रासमोर आल्यानंतर सर्वपक्षीय आमदार मुख्य सूत्रधारांची नावे घेऊन आम्ही रोखठोक भूमिका मांडली, त्यामुळेच एसपींची बदली झाली. आता सरकार या प्रकरणात काय काय पावले उचलणार आहे, याची माहिती घेण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
कराडवर खंडणीचा गुन्हा, हत्येप्रकरणाही त्याची चौकशी केली पाहिजे
तसेच कराडवर खंडणीचा गुन्हा आहे. हत्येच्या अनुषंगानेही त्याचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर आरोपींचे सीडीआर काढून त्यांच्यावर कारवाई पुराव्यानिशी कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे क्षीरसागर म्हणाले.
आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
देशमुख हत्या प्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. तीन चार महिन्यांत हवे तर त्यांना पुन्हा शपथ द्या पण आत्ता त्यांचा राजीनामा घ्या, असे क्षीरसागर म्हणाले.