
वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणावर मोठा गौप्यस्फोट..!
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड शरण आला आहे. वाल्मिक कराडने व्हिडिओ जारी केला आणि त्यानंतर काही वेळातच तो पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला.
त्यानंतर आता सीआय़डीने त्याची चौकशी सुरू केली आहे. तत्पुर्वी वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.त्यात आता एका नेत्याने बड्या मंत्र्याला वाचवणाऱ्या शक्तींनी सरेंडरचे आदेश दिलेत का? असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.
काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणावर एक्स या सोशल मीडिया माध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी विजय वड्डेटीवार यांनी पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलिस – सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही!, अशी टीका वड्डेटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलीय.
महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का? वाल्मिक कराडला इतके दिवस लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे, असे वड्डेटीवार यांनी म्हटले.
वाल्मिक कराडची हिंमत तर इतकी की सरेंडर होण्याआधी हा व्हिडिओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवले आहे ते पाहता पोलीस, सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही,अशी मागणी विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.