
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या हत्येला 22 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही या प्रकरणातील काही आरोपी फरार आहे.
यामुळे सरकार आणि पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी या प्रकरणाती संशयित आरोपी वाल्मिक कराडने सीआयडीसमोर सरेंडर केलं आहे. यानंतर आता संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं बोललं जातंय. तसेच याप्रकरणातील मुख्य आरोपीला लवकरच अटक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वाल्मिक कराड हे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचंही कनेक्शन जोडलं जातंय. या प्रकरणात मंत्र्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील केली आहे. या सर्व घडामोडीनंतर अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बीड प्रकरणाशी धनंजय मुंडेंच्या जोडल्या जाणाऱ्या कनेक्शनवर भाष्य केलं आहे.
बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी, असं वक्तव्य मंत्री भरणे यांनी केलं आहे. अनेक जण मंत्र्यांचे मित्र असतात, पण त्यांनी गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणं कितपत योग्य आहे, असा सवालही भरणे यांनी उपस्थित केला आहे. भीमा कोरेगाव इथं पत्रकारांशी संवाद साधताना दत्तात्रय भरणे यांनी हे वक्तव्य केलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यापासून लांब राहणं पसंत केलंय. अशात दत्तात्रय भरणे यांनी मात्र मुंडेंना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आहे.
भरणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी त्यांनी अजून पदभार स्विकारला नाहीये. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत. यावरही भरणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी लवकरच मंत्रीपदाचा पदभार स्विकारणार आहे. मी नाराज नाही. पुढच्या आठवड्यात मुंबईला जाऊन मी नक्की माझा पदभार स्विकारणार आहे. गेली दहा वर्षे मी काम करत आहे. आता मी सुट्टीवर गेलो होतो. मंत्रीपदावरून माझी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. 2025 मध्ये मंत्री म्हणून चांगल काम करणार, असं भरणे म्हणाले. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारच होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.