
भरणेमामांचं मत!
बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड काल सीआयडी कार्यालयात शरण आला. त्याला 14 दिवसांची कोठडी सोनवण्यात आल्यानंतर आज भीमा कोरेगाव येथे आलेल्या क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्रकाराने प्रश्न विचारले असता, बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा संबंध असल्याचा आरोप राज्यभरातून विरोधक करत आहेत यावरून संपूर्ण राज्यात वातावरण संतप्त आहे त्या पार्श्वभूमीवर आज परदेशातून आलेल्या क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्रकारांनी अचानक प्रश्न विचारले आणि त्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
भरणे म्हणाले, अनेक मंत्र्यांचे मित्र असतात. मग त्यांनी गुन्हा केला, म्हणून मंत्र्यावर आरोप करणे कितपत योग्य होईल? राजकीय व सामाजिक जीवनात अनेकांना भेटावे लागते. या अनुषंगाने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणे योग्य नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान आपण कुठेही नाराज नसल्याचे देखील दत्तात्रय भरणे यांनी सांगितले व भरणे हे नाराज आहेत अशा सुरू असलेल्या चर्चेचे खंडन केले. त्यांनी सांगितले की, गेले दहा वर्ष मी अखंडपणे काम करत आहे. आत्ता मी सुट्टीवर गेलो होतो. कुठल्याही प्रकारची नाराजी मंत्रीपदावरून नाही. 2025 मध्ये देखील मंत्री म्हणून मी चांगलं काम करणार आहे असे ते म्हणाले.