
CID तपासात सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळेबाबत मोठी माहिती समोर
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सीआयडी तपासानंतर अनेक मोठे खुलासे होत आहे. या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे फरार आहेत.
या दोघांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता.
कृष्णा आंधळे गुन्हा दाखल झाल्यानंतर 2023 पासून फरार आहे. त्यामुळे वर्षभर देखील त्याला अटक का होत नाही असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरा आरोपी सुदर्शन घुले 2020 मध्ये हत्येच्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळाल्यानंतर तुरुंगाबाहेर होता. घुलेशी संबंधित लोकांच्या चौकशीनंतर ही माहिती समोर आली आहे.पोलिसांनी कारवाई केली असती तर सरपंच संतोष देशमुखांची हत्या टळली असती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी करण्यात आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी गावात सुदर्शन घुले याचे घर आहे. फरार तिन्ही आरोपीच्या नातेवाईकांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांनकडून कसून चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नातेवाईकांच्या संपर्कात हे तिन्ही आरोपी आहेत का याचा ही तपास सीआयडी कडून होत असल्याची माहिती आहे. सीआयडी कडून तिन्ही आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.
हत्या प्रकरणातील तिघेही आरोपी फरार
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे. तर यात कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे असे दोन साथीदार आहेत. सध्या हे तिघेही ही फरार असून गेल्या 22 दिवसापासून सीआयडी त्यांचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप सुदर्शन घुलेचा पत्ता काही लागलेला नाही. सुदर्शन घुले मिळाल्यास या प्रकरणाची पाळेमुळे उघड होणार असून त्याने कोणच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या केली? मारहाण करताना त्याने कोणाला व्हिडिओ कॉल केला? या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. यामुळे सीआयडी त्याच्या मागावर आहे.