
नेपाळ ‘कनेक्शन’ आलं समोर
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहे.
याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडनं सीआयडीसमोर सरेंडर केलं आहे. यामुळे पोलीस तपासाला वेग आल्याचं बोललं गेलं. पण अजूनही तीन आरोपी फरार आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी सीआयडीची सात पथकं देशभर रवाना झाली आहेत. तरीही मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा अद्याप थांगपत्ता लागत नाहीये.
त्यामुळे सुदर्शन घुलेनं देश सोडला का? असा संशय व्यक्त केला जात आहे. सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी तो नेपाळला गेल्याचा इतिहास आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपीनं पोलिसांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी नेपाळला पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने सीआयडीनं तपासाला देखील सुरुवात केलीय. याबाबतची माहिती सीआयडीतील खात्रीलायक सूत्रांनी ‘न्यूज १८ लोकमत’ला दिली आहे.
सुदर्शन घुलेचं नेपाळ कनेक्शन काय?
सीआयडीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सीआयडीने 7 पथके विविध राज्यासह देशभर रवाना केली आहेत. या अगोदर सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याने सराईत गुन्हेगार आहे. तसेच यापूर्वी एका गुन्हात फरार असताना तो नेपाळला गेल्याची देखील माहिती समोर आहे. त्यामुळे पुन्हा तो नेपाळला जाऊ शकतो का? किंवा नेपाळला गेला का? या संदर्भात सीआयडीला संशय आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील सीआयडी तपास करत आहे. फरार असलेले तीन आरोपी यांना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडीने आता तपासाचा फास आवळला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 23 दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान एसआयटीची घोषणा केली होती. बुधवारी, या एसआयटी स्थापनेची गृह विभागाकडून अधिकृत आदेश काढण्यात आले.
एसआयटीमध्ये कोणाचा समावेश?
– आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली – पोलीस उपमहानिरीक्षक
– अनिल गुजर – पो. उप अधीक्षक
– विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
– महेश विघ्ने – पो.उ.निरीक्षक
– आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
– तुळशीराम जगताप – सहा. पो. उ. निरीक्षक
– मनोज राजेंद्र वाघ – पोलीस हवालदार
– चंद्रकांत एस.काळकुटे – पोलीस नाईक
– बाळासाहेब देविदास अहंकारे – पोलीस नाईक
– संतोष भगवानराव गित्ते – पोलीस शिपाई