
सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता, संतोष देशमुखांचा मारेकरी कसा सापडणार..?
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल 25 दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप तीन मारेकरी फरार आहेत. त्यामुळे बीड पोलीस आणि सीआयडीच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केल्या जात आहेत.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडीची एकूण 9 पथके तयार करण्यात आली असून त्यामध्ये जवळपास 150 जणांचा समावेश आहे. तरीदेखील वाल्मिक कराड आणि अन्य तीन आरोपींचा माग काढणे सीआयडीला जमले नव्हते. अशातच संतोष देशमुख प्रकरणातील एक मारेकरी देश सोडून पळाल्याची माहिती समोर येत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सात पथके विविध राज्यासह देशभर रवाना करण्यात आली आहेत. सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार असून तो यापूर्वी नेपाळला जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले पुन्हा नेपाळला जाऊन लपल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सीआयडीची पथके सध्या सुदर्शन घुले याचा कसून शोध घेत आहेत. तो देशाबाहेर पळून गेला आहे का, याचा तपासही सीआयडीकडून सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फरार असलेले तीन आरोपी यांना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडीने आता तपासाचा फास आवळत आहे. मात्र, अद्याप सीआयडीला यश मिळालेले नाही.
वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, सगळंच बाहेर येईल: सचिन खरात
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला होता. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे राज्याच्या प्रत्येक घरात एकच चर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. बीड मधील नेते म्हणत आहेत बीडची परिस्थिती बिहार सारखी झालेली आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो बीडची परिस्थिती गुंडांनी अफगाणिस्तानसारखी केलेली आहे.
परंतु सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मीक कराड यांच्यावर दोन तीन दिवसांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. यानंतर वाल्मीक कराड हा फरार झाला, मग खरंच वाल्मीक कराड निर्दोष होता तर तो फरार का झाला? त्यानंतर हाच वाल्मीक कराड स्वतः सरेंडर सीआयडी ऑफिसला पुण्यात झाला. या सगळ्या बाबी संशयास्पद आहेत. त्यामुळे या वाल्मीक कराडची तात्काळ नार्को टेस्ट करा, मग सगळंच बाहेर येईल, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी म्हटले.