
राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीतील मंत्रिपदांप्रमाणे पालकमंत्री पदाची समीकरणेही बदलली जातील. त्यानुसार वादग्रस्त बीड (Beed) जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपाकडे जाण्याची शक्यता असून राष्ट्रवादीला हा मोठा झटका मानला जात आहे.
जुनी समीकरणे
महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश झाल्यानंतर बीड (Beed) जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यावेळी सत्ताधारी भाजपाचे १०५ आमदार होते तर शिवसेनेचे (शिंदे) ५० (४० शिवसेना +१० अपक्ष) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४० आमदार होते. त्यावरूनच पालकमंत्री पदे देण्यात आली होती.
भाजपाचाच वरचश्मा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. २८८ पैकी २३७ आमदारांसह महायुतीचे सरकार सत्तेत बसले. यात भाजपाचे १३२ आमदार असून शिवसेना (शिंदे) ५७, अजित पवार राष्ट्रवादीचे ४१ आमदार आणि काही अपक्ष आहेत. त्यामुळे या टर्ममध्ये भाजपाची ताकद आणखी वाढली असून भाजपाच्या वाट्याला अधिक मंत्रिपदे आली. याच धर्तीवर पालकमंत्री पदांचे वाटप होईल, तेव्हा त्यावर भाजपाचाच वरचश्मा म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असेल, अशी शक्यता आहे.
दोन्ही मुंडेना मंत्रिपद, पालकमंत्रीपद बाहेरच
सध्या बीडमध्ये (Beed) कायदा-सुव्यवस्था परिस्थिती बिघडल्याचे चित्र आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले, तसेच धनंजय किंवा पंकजा मुंडे नव्हे, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच बीडचे पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी धस यांनी केली. बीडच्या दोन्ही मुंडेना, धनंजय आणि पंकजा, मंत्रिपद मिळाले असले तरी पालकमंत्री हा बीडबाहेरचाच असेल असे बोलले जात आहे. बीडचे (Beed) पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडून भाजपाकडे जाण्याची शक्यता अधिक असल्याने राष्ट्रवादीला हा झटका मानला जात आहे.