केज कोर्टाकडे केली मागणी…
बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराड कोठडीत आहे. ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आलेल्या वाल्मिकला केज कोर्टाने १५ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराड हा सध्या बीड शहर पोलिस ठाण्यातल्या कोठडीमध्ये आहे. वाल्मिकलला खास सुविधा मिळत असल्याचा बीड पोलिसांवर आरोप होत आहे. शिवाय आरोपीला भेटण्यासाठी बाहेरचे लोक येत असल्याचाही आरोप आहे. त्यातच आता वाल्मिक कराडने कोर्टाकडे एक मदतनीस मागितला आहे. त्यासाठी एका आजाराचं कारण देण्यात आलेलं आहे.
sleep apnea हा आजार असल्याचं सांगून वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टाकडे मदतनीस देण्याची मागणी केली आहे. झोपण्यापूर्वी आरोपीला ऑक्सिजन मशीन लावावं लागतं. हे ऑटो सीपॅप मशीन चालवण्यासाठी मदतनीस गरजेचा आहे. तो मदतनीस २४ तास सोबत पाहिजे, अशी मागणी केज कोर्टाकडे करण्यात आलेली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. तीन आरोपींना पोलिसांनी फरारी घोषित केले. आरोपींबाबत माहिती कळविणाऱ्यांना बक्षीस देऊ, असे जिल्हा पोलिस दलातर्फे कळविण्यात आले आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याची नोंद केज पोलिस ठाण्यात झालेली असून तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. यातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे हे आरोपी अद्यापही फरार आहेत.
सात जणांवर गुन्हा नोंद
संतोष देशमुख खून प्रकरणात केज पोलिस ठाण्यात सुदर्शन घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार व कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या सात जणांवर गुन्हा नोंद आहे.
चार आरोपी पोलिस कोठडीत
पोलिसांनी जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, विष्णू चाटेला अटक केलेली आहे. चौघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. विष्णू चाटे खंडणी प्रकरणात कोठडीत आहे. या गुन्ह्यातील सुदर्शन चंद्रभान घुले (वय २६, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा शामराव आंधळे (वय ३०, रा. मैंदवाडी, ता. धारुर), सुधीर ज्ञानोबा सांगळे (वय २३, रा. टाकळी, ता. केज) तिघे घटनेच्या २५ दिवसांनंतरही फरार आहेत.
