
केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari Pune Speech) यांनी बालगंधर्व रंगमंदिरात उपस्थिती लावली होती. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अमृतमहोत्सव अभिष्टचिंतन सोहळ्यास नितीन गडकरींनी रोखठोक आपलं मत मांडलं.
त्यावेळी गडकरींनी केलेल्या दोन वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसतेय. नितीन गडकरी यांनी यावेळी शिवाजी महाराजांच्या सेक्यूलर भूमिकेवर वक्तव्य केलं अन् भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच राजकारणात युज अँड थ्रो केला जातो, असंही नितीन गडकरींनी यावेळी म्हटलं. गडकरींनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
‘शिवाजी महाराज खरे सेक्यूलर होते, त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. कधी कुठल्या महिलेवर अत्याचार केला नाही. एवढंच नाही कधीच कुठल्या प्रार्थनास्थळावर हल्ला केला नाही. त्यांचा खरा सर्वधर्मसमभाव होता. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष नाही तर सर्वधर्मसंभव आहे’, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय. नितीन गडकरींच्या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. भाजपची हिंदूत्ववादी भूमिका अधिक प्रखरतेने झळकत असताना नितीन गडकरींचं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.
‘अनेक समजांना मिळून आपला देश तयार झाला आहे. पण राजकारणाबद्दल माझं मत काही चांगल नाही इथं फक्त युज आणि थ्रो केला जातो’, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. नितीन गडकरींचा इशारा कोणावर होता? अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणे आवश्यक असतं, असंही गडकरी यावेळी म्हणाले होते.
दरम्यान, मी अनेक आंदोलनात होतो, 50 रुपये पण कोणी द्यायला तयार नव्हतं. पैसा आयुष्यातल सध्या नाही पण साधन आहे. या जातीय अपृश्यता वाईट आहे ती समाप्त झालं पाहिजे. शेवटी तुमची गुणवत्ता महत्त्वाची आहे. राजकारणाच्या आपल्या मर्यादा आहेत, असंही गडकरी यांनी यावेळी म्हटलं. आजकाल प्रत्येकाला आमदार, खासदार आणि मंत्रीपद पाहिजे. नको म्हणणार कोणी नाही. राजकारणात असं होतं की, जो नको म्हणतो त्याच्या मागे पळतं आणि ज्याला हाव त्याच्यापासून पळत जातो, असं देखील गडकरी यावेळी म्हणाले.