
अजितदादा नागरिकांवर संतापले, काय झालं नेमकं?
आपल्या रोखठोक वक्तव्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कायम चर्चेत असतात. याच रोखठोक वक्तव्यामुळे अजित पवार हे अनेकदा वादातही अडकले आहेत. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते.
आता, आपलं होमग्राउंडवर बारामतीमध्ये बोलताना अजित पवारांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडली. या फुटीनंतर राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे गेले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी जोरदार कमबॅक करत काका शरद पवारांना धोबीपछाड दिला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारमध्ये अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती आली.
हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर अजित पवार हे सहकुटुंब परदेश दौऱ्यावर होते. सुट्टीवरून आल्यानंतर अजित पवारांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. रविवारी, उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन केले. बारामतीमधील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्धाटन त्यांच्या हस्ते पार पडले. याचवेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापले.
अजित पवार काय म्हणाले?
एका पेट्रोल पंपाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन स्वीकारत होत. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना सूचना देखील देत होते. त्याच वेळी एका कार्यकर्त्याने आपली कामे झाली नसल्याचा सांगितले. त्याच्या सारखी कैफियत इतर नागरिकांनी देखील मांडली. त्यावर अजित पवार संतापले. त्यावर त्यांनी, “अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?”, अशा शब्दात संताप व्यक्त केला.